Wardha Crime : वृद्धाच्या मृत्यूचं गूढ उकललं, पार्टीतील वादाचा वचपा काढण्यासाठी जिवंत जाळलं
वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये घटलेल्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. मटणाच्या पार्टीतील वादाचा वचपा काढण्यासाठी वृद्धाला जिवंत जाळलं. या प्रकरणात माजी सैनिकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील नांदपूर येथील रहिवासी असलेल्या अभिमान नथ्थूजी पखाले या वृद्धाच्या हत्येचे गूढ उलगडण्यात आर्वी पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकासह तिघांना अटक केली आहे. सुभाष ऊर्फ बबलू मारुती पखाले, प्रमोद ऊर्फ बाल्या सूर्यभान दहाट, मारुती कोरकुजी पखाले, सर्व रा. नांदपूर (धनोडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मटणाच्या पार्टीत झालेल्या वादाचा वचपा म्हणून तिन्ही आरोपींनी अभिमान पखाले यांना जिवंत जाळलं.
संबंधित वृद्धाची 28 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. घटनेच्या एक दिवसापूर्वी आरोपी आणि मृत यांच्यात मटण आणि ओल्या पार्टीदरम्यान वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी या तिन्ही आरोपींनी संगनमत करुन अभिमान या वृद्धाला जिवंत पेटवून त्याची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
सुभाष ऊर्फ बबलू मारुती पखाले हा माजी सैनिक आहे. तो औरंगाबाद इथे त्याच्या परिवारासोबत राहतो. परंतु असं असलं तरी तो नांदपूर या गावाला अधूनमधून यायचा. भरपूर दिवस इथे राहून तो शासनाकडून अल्पदरात मिळणारी दारु त्याच्या निकटवर्तीयांना पाजायचा. घटनेच्या एक दिवसापूर्वी सुभाषच्या घरी ओली पार्टी रंगली. याच पार्टीत झालेल्या वादात सुभाषने अभिमानला मारहाण केली होती; पण दुसऱ्या दिवशी अभिमान हा त्याच्या घरी आंघोळीसाठी आला असता तिन्ही आरोपींनी संगनमत करुन अभिमानच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला जाळले. यानंतर अभिमान पखाले यांना तातडीने आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती अभिमान पखाले यांना मृत घोषित केलं.
या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.