वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं; रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच घडला थरार; गणपत आणि महेश गायकवडांमध्ये रात्री नेमकं काय झालं?
गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहेत. मग ते जमिनीचे वाद असतील राजकीय वाद असतील हे वाद सुरू आहेत.
Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad : कल्याण तालुक्यातील (Kalyan Crime) द्वारली गावातील जाधव कुटुंबांचीची जमीन गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी विकत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातून वाद-विवाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरू असल्यानं पाहणी करण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) त्या जागेवरती गेले, जागेवर सुरू असलेलं कंपाउंडचं काम पाडण्यास सुरुवात केली. हा वाद त्या ठिकाणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संबंधित घटनेची माहिती दिली.
त्यावेळी गणपत गायकवाड यांनी वैभव गायकवाड यांच्याशी कुठलाही वाद न घालता संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर तक्रार देण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे वैभव उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड राहुल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते दाखल झाले. महेश गायकवाड हे लाईन पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला केबिनच्या बाहेर वैभव गायकवाड उभे असताना त्या ठिकाणी वैभव यांना महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बाचाबाची झाली. त्यावेळी पुन्हा वैभव यांनी आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संपर्क साधून पोलीस कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत, असं सांगितलं त्यानंतर लागलीच गणपत गायकवाडही लाईन पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनला जमा झाले. गणपत गायकवाड जसे पोलीस स्टेशनला आले, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये बसले, त्यांच्या अगोदरच त्या केबिनमध्ये महेश गायकवाड त्यांचा साथीदार राहुल पाटील हे उपस्थित होते.
बॉडीगार्डच्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या
केबिनमध्ये या तिघांची चर्चा सुरू असताना बाहेर गोंधळ झाला तो गोंधळ पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप बाहेर गेले. तेवढ्यात गणपत गायकवाड महेश पाटील यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या वादामध्ये गायकवाड यांच्या जवळ असलेल्या बंदुकीमधून त्यांनी पाच गोळ्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने झाडल्या. गणपत गायकवाड यांच्या रिव्हॉलवर मधल्या गोळ्या संपल्यानंतर त्यांच्यासोबत खाजगी अंगरक्षकाने त्याच्या जवळील बंदुकीमधून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या केबिनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले आणि त्यांनी त्या अंगरक्षकाची बंदूक पकडली आणि पुढील अनर्थ टळला.
महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी
गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज एका व्हिडिओमध्ये दिसून येत आह. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ उडाली झाली. या घटनेमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहेत. मग ते जमिनीचे वाद असतील राजकीय वाद असतील हे वाद सुरू आहेत.
सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज
तीन ते चार महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी एकमेकांना विकास कामावरून आव्हान केले होते. एकमेकांना विरुद्ध सोशल मीडियात टीका टिपणी केली होती त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज केले तुम्ही केलेले विकासकामे हे जनतेसमोर मांडा असे आव्हान केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड वार्डमध्ये दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले. हा वाद एवढा चिघळला दोघांनी एकमेकांना आव्हान केल्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतले आणि यांचा होणारा वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टाळला.
वादाचा अंत उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये
गणपत गायकवाड यांनी वेळोवेळी त्यांचा आमदार निधी हा वापरला जात नाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असे आरोप प्रत्यारोप अनेक वेळा त्यांनी केले आहेत. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड नाराज होते. तीन दिवसांपासून गणपत गायकवाड यांचा कल्याणमध्ये कधी उद्घाटनावरून तर कधी जमिनीवरून वाद सुरू आहे आणि या वादाचा अखेर अंत काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाला.
हे ही वाचा :
"मला मनस्ताप झाला, मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली"; गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया