Ganpat Gaikwad: "मला मनस्ताप झाला, मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली"; गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया
पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रसार माध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ganpat Gaikwad: उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील (Thane News) ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 50 गुंठ जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. अशातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी होय, मीच गोळीबार केला, असं म्हणत गोळीबार केल्याचं मान्य केलं आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी म्हटलं की, "पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली."
"मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलं आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले", असंही गणपत गायकवाड यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होतं. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरू असताना गणपत गायकवाड यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. विस्तृत माहिती देण्यास पोलीस नकार देत आहेत. आमदार गायकवाड यांना पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले आहे. शहरप्रमुख गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार गायकवाड यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.