(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News: बोरिवलीमध्ये किरकोळ कारणामुळे मजुराची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime News: मुंबईतील बोरीवली परिसरात एका मजुराची निघृण हत्या करण्यात आली आहे.तसेच हत्या केलेल्या आरोपाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Mumbai Crime News: मुंबईच्या बोरिवली (Borivali) पूर्वेकडील देवीपाडा याठिकाणी कडिया काम करणाऱ्या एका मजूराची हत्या करण्यात आली आहे. दोन मित्रांच्या किरकोळ भांडाणाचे वादात रुपांतर झाले. हा वाद इतका टोकाला गेला की या वादामुळे एका मित्राची हत्या झाली. यामध्ये अजित कुमार सहानी वयवर्ष 33 याचा राम पुकार सहानी वयवर्षे 30 याने हत्या केली. याप्रकरणी मृत तरुणाच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आरोपी रामप्रकाश सहाने याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
बोरिवली पूर्वेकडील देवीपाडा परिसरात उत्तर प्रदेशमधील कडिया काम करणारे दहा तरुण एकत्र राहत होते.आरोपी आणि मृत तरुणांमध्ये नेहमीच किरकोळ गोष्टीवरुन वाद होत होता. मात्र शुक्रवारी झालेल्या वादामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला.एका मित्राने दुसऱ्या मित्राला त्याच्या व्यवसायावरुन डिवचल्याने या मित्रांमधील भांडणाचे रुपांतर वादामध्ये झाले. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत रामपुकार सहानी याने सुरुवातीस चाकूने वार केला. त्यावेळी अजितकुमार याने स्वतःस वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर आरोपी रामकुमार सहानी याने अजितकुमार सहानी याच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केली.
या हत्येची माहिती आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलिसांना न कळवता थेट उत्तर प्रदेशातील त्यांच्या नातेवाईकांना कळवले. त्यानंतर नातेवाईकांनी मृत तरुणाच्या मुंबईतील भावाला फोन करुन घडलेला प्रकार कळवला. त्यानंतर त्याच्या भावाने कस्तुरबा मार्ग पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची नोंद घेत तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रामपुकार सहानी याला देवीपाडा परिसरातून अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीला कोणती शिक्षा करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकत्र काम करणाऱ्या या मित्रांमध्ये झालेल्या वादामुळे एकाला त्याच्या आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे रागाच्या भरात झालेल्या या घटनेमुळे बोरिवली परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन देखील आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक देखील केली आहे. मुंबईत मागील गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं सत्र वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लालबाग, वसई, मिरारोड याठिकाणी झालेल्या गुन्हेगारीच्या सत्रामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र सध्या मुंबईत आहे. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :