Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब, पोलिसांकडून एकाला अटक
Kolhapur News: कोल्हापूरमध्ये एका व्यापाऱ्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हुपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरु.
कोल्हापूर: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असतानाच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा (Silver) व्यापार करणाऱ्या एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चोरीच्या उद्देशानेच ब्रह्मनाथ यांची हत्या झाली असावी. कारण ब्रह्मनाथ हालोंढे यांच्या हत्येनंतर त्यांच्याकडील 25 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने तपास सुरु केला आहे. सध्या हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार आणि ब्रह्मनाथ हालोंढे यांचा मारेकरी सापडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोल्हापूरच्या आराम कॉर्नरला एकाचा खून
कोल्हापूरच्या आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. इम्रान मुजावर आणि युसूफ अलमजीद या दोघांमध्ये हातगाडी लावण्यावरुन वाद झाला. त्यावेळी युसूफने इम्रान याची पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली.
नाशिकच्या पाथर्डीत टोळक्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
नाशिकच्या पाथर्डी गावात एका युवकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने जवळपास 25 वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे . नंदेश विजय साळवे (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नंदेश याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमी नंदेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा