Kalyan Crime : पंजाबमधील शार्प शूटर्सना कल्याणमध्ये आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
Kalyan Crime : पंजाबमधील अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या तीन शार्प शूटर्सना आश्रय देणाऱ्या म्हणजेच भाड्याने घर देणाऱ्या बांधकाम व्यवसायिक प्रमोद पांडे यांच्याविरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Kalyan Crime : पंजाबमधील (Punjab) कुख्यात शार्प शाप शूटर्सना (Sharp Shooters) कल्याणच्या (Kalyan) आंबिवली परिसरातून अटक करण्यात आली आहे. हे तिघे कुख्यात आरोपी पंजाबमधील अनेक गुन्ह्यात फरार असून यांना आश्रय देणाऱ्या म्हणजेच भाड्याने घर देणाऱ्या बांधकाम व्यवसायिक (Builder) प्रमोद पांडे यांच्याविरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
शार्प शूटर्स खत्री गँगचे सदस्य
काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिम येथील आंबिवली इथल्या यादव नगर परिसरातील ओम साई अपार्टमेंट इमारतीत एका फ्लॅटमध्ये पंजाब अँटी गँगस्टर पथक, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या छापेमारी दरम्यान पोलिसांना तीन कुख्यात शार्प शूटर्स आढळले. तिघांवर पंजाबमधील शहीद भगतसिंग नगरमध्ये एका हत्याकांडात सामील असल्याचे आरोप आहे. एवढेच नाही तर हे तिघे डॉन सोनू सिंग खत्री गॅंगचे सदस्य आहेत.
बांधकाम व्यावसायिकाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता भाडेकरु ठेवले
या गुन्हेगारांना इमारतीमध्ये घर भाड्याने देत आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक प्रमोद पांडे यांच्याविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद पांडे यांनी भाडेकरु ठेवताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया केली नाही. याची माहिती पोलिसांना दिली नाही. पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हे तिघे आरोपी या राज्यात काही गुन्हा करणार होते का? त्यांना या ठिकाणी कोणी आणलं होतं का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात मिळणार आहेत.
पंजाबमध्ये हत्या करुन पसार झाले आणि कल्याणमध्ये लपून बसले
पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस (Mumbai ATS) आणि खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) 9 जानेवारी रोजी पहाटे संयुक्त कारवाई करत कल्याणमधून तीन शार्प शूटर्सना अटक केली होती. हे तिघे पंजाबमध्ये झालेल्या मख्खन सिंह हत्याकांडात फरार होते. या हत्याकांडात पंजाब पोलिसांनी मनदीप सिंह या आरोपीला अटक केली होती. तर उर्वरित आरोपींच्या शोधात होते. पंजाबमध्ये हत्या करुन तिनही शार्प शूटर्सनी तिथून पोबारा केला होता. त्यानंतर त्यांनी कल्याण (Kalyan News) गाठलं आणि यादव नगर परिसरात लपून बसले. तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या शोधात होते. अशातच खबरींकडून कल्याणमधील एका इमारतीत कुख्यात गुंड लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासूनच पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अधिकारी परिसराची रेकी करत होते. अखेर 9 जानेवारी रोजी पहाटे संयुक्त कारवाई करत या तिन्ही शार्प शूटर्सना अटक करण्यात आली. शिवम सिंह, गुरुमुख सिंह, अमनदीप कुमार अशी या शार्प शूटर्सची नावं आहे.
संबंधित बातमी