Kalyan Crime : खासगी बॉडीगार्ड न्यायालयात थेट बंदूक घेऊन शिरला, न्यायाधीशांच्या दालनाबाहेर येताच...
Kalyan Crime : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील साकेत न्यायालयात एक वकिलाने महिलेवर चार राऊंड फायर केल्याची घटना समोर आली होती.
Kalyan Crime : दिल्लीतील (Delhi) साकेत न्यायालयात एका वकिलाने महिलेवर चार राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र या घटनेनंतर अजूनही भारतातील काही न्यायालयांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. कल्याण न्यायालयात (Kalyan Crime ) पोलिसांच्या समोर एक बंदूक धारी न्यायालयात (Kalyan Court) फिरत असल्याचे चित्र एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अंगरक्षक चक्क न्यायालयात बंदुक घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
सुरक्षा रक्षकाने महेश भोईर यांचा अंगरक्षक असल्याचे सांगितले
अधिकची माहिती अशी की, कल्याण न्यायालयात न्यायाधीशाच्या दालना बाहेर एक व्यक्ती बंदूक घेऊन उभा होता. काही वकिलांनी त्याला हटकल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीला न्यायालया बाहेर जाण्यास सांगितले. मात्र हा बंदूकधारी न्यायालयाच्या प्रत्येक मजल्यावर फिरत असल्याचे दिसून आले. एबीपी माझाचा कॅमेरा पाहून त्याने न्यायालयाबाहेर पळ काढला. एबीपी माझाच्या रिपोर्टरने त्या बंदूकधारी व्यक्तीला विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने महेश भोईर यांचा अंगरक्षक असल्याचे सांगितले. मात्र हा महेश भोईर नेमका कोण हे समजू शकले नाही. महेश भोईर एका गुन्ह्या संदर्भात कल्याण न्यायालयात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या