Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने 10 ते 15 गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबाला मारहाण केली होती.
मुंबई : कल्याणमध्ये (Kalyan) अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) या सरकारी अधिकाऱ्याने 10 ते 15 गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबाला मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2024) देखील उमटल्याचे दिसून आले. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून अखिलेश शुक्लासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही तपासून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता आणि कळवीकट्टे कुटुंबीयांमध्ये वाद झाला. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी गेले. यानंतर अखिलेश शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. तसेच मनसे, शिवसेना ठाकरे गटानेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली.
अखिलेश शुक्लासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणातील अखिलेश शुक्लाने त्याची भूमिका मांडणारी चित्रफित समाजमाध्यमात प्रसिद्ध केली होती. या चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी शुक्ला यांना टिटवाळा-शहाड भागातून ताब्यात घेतले आहे. तर अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या दहा जणांपैकी दोन जणांना विशेष पथकांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोन जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. सुमित जाधव (23), रंगा उर्फ दर्शन बोराडे (22) असे ताब्यात घेतलेल्या इसमांचे नावे आहेत.
पोलिसांवर कारवाईचा बडगा?
तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत. या प्रकरणात ते दोषी आढळून आले तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. आता या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा