संतापजनक! प्रेताला चाचपून पाहिलं , अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या, जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार
चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मृतदेहाच्या ठिकाणी पंचपक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवलेले आढळले ,ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि चीड दोन्ही निर्माण झाली आहे.

Jalgaon Crime: जळगाव शहरात मानवी संवेदनांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थीसह अंगावरील दागिने चोरीस जाण्याच्या घटना वाढू लागल्या असून, केवळ एका आठवड्यात दुसऱ्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपूर्वी मेहरूण स्मशानभूमीत छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी आणि मान-पायाजवळील दागिने गायब झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घटनेचा धक्का शहरभर पोहोचत असतानाच, आता शिवाजीनगर स्मशानभूमीतही असाच प्रकार घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Crime News)
Jalgaon Crime: नेमके घडले काय?
शिवाजीनगर परिसरातील खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा परवा शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. आज सकाळी नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत आले असता, त्यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राखेसह डोके आणि पायाजवळील अस्थी गायब झाल्याचे पाहून धक्का बसला. त्याचबरोबर जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे चार ग्रॅम सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचे लक्षात आले.
या घटनेमुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, “मयताच्या अस्थी आणि दागिने चोरीस जाणे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे,” असे मत सुरेश भोळे यांनी व्यक्त केले. त्यांनी मनपा प्रशासनावर जबाबदारी टाकत म्हटलं की, “मनपा नागरिकांना जिवंतपणी सुविधा देत नाही, पण निदान मृत्यूनंतर तरी सुरक्षितता मिळावी. आम्ही या बाबत पुरावे सादर करून प्रशासनाकडे तक्रार करणार आहोत.” आश्चर्य म्हणजे, चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मृतदेहाच्या ठिकाणी पंचपक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवलेले आढळले ,ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि चीड दोन्ही निर्माण झाली आहे.
मनापा प्रशासनावर रोष
मेहरूण येथील आधीच्या घटनेत छबाबाई पाटील यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, शिवाजीनगर येथील प्रकरणात अद्याप नातेवाईकांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या दोन सलग घटनांनंतर मनपा प्रशासन आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. “अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि सुरक्षा रक्षक नेमणे अत्यावश्यक आहे,” असे पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी सांगितले.
हेही वाचा























