(Source: ECI | ABP NEWS)
Nashik Crime Pavan Pawar: आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी! शिंदे गटाच्या फरार नेत्याचं 'रील' व्हायरल; 'बाहुबली'वर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
Nashik Crime Pavan Pawar: कोणी लागत नाही नादी, असे रील तयार करीत व्हायरल केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.

Nashik Crime Pavan Pawar: नाशिक शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचा नेता माजी नगरसेवक पवन पवार (Pavan Pawar) आणि त्याच्या साथीदारांनी "कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर..." अशा आशयाचं धमकीचं रॅप साँग असलेलं रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याने पवन पवारवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime Pavan Pawar: काय आहे प्रकरण?
नाशिकच्या जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि त्याचे सहकारी वतन ब्रह्मानंद वाघमारे, सोहेल पठाण, तथागत, आशिष वाघमारे आणि नीलेश भोसले यांनी आपल्या एक धमकीचा मजकूर असलेलं रील तयार केलं. या रीलमध्ये "आमचंच साम्राज्य आहे", "कोणी लागत नाही नादी" असे बोल वापरून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Nashik Crime Pavan Pawar: पवन पवारवर गुन्हा दाखल
या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्याच्या साथीदारांवर याआधी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यानंतर पवन पवार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. आता पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Nashik Crime Prakash Londhe: लोंढे पिता-पुत्राने कब्जा केलेला बंगला सील
दरम्यान, नाशिकमध्ये गँगस्टर स्टाइलने कब्जा करण्यात आलेला बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे. लोंढे पिता-पुत्र टोळीने खुटवडनगरमधील ‘पुष्कर बंगला’ जबरदस्तीने बळकविल्याची तक्रार 08 ऑक्टोबरला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी अखेर अंबड पोलिसांनी धडक कारवाई करत पुष्कर बंगला सील केला आहे. लोंढे पिता-पुत्र टोळीने बंगल्याच्या कर्जाचा फायदा घेत, बंगल्याच्या मूळ मालकाला धमकावून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, व गुन्हे शोध पथकाने महत्वाची भूमिका बजावली. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, पोलिसांनी पुष्कर बंगला सील केला आहे. लोंढे टोळीच्या विरोधात तक्रारी आणि गुन्ह्यांचा पोलीस तपासाला वेग आला आहे.
आणखी वाचा
























