दोन मुली झाल्याच्या रागातून पतीचे पत्नीवर वार, हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी, पती अटकेत
Maharashtra Yavatmal Crime News : दोन मुली झाल्याच्या रागातून लोखंडी कोयत्यानं पतीनं पत्नीवर वार केले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून पती अटकेत आहे.

Maharashtra Yavatmal Crime News : लागोपाठ दोन मुली झाल्याच्या रागातून पतीनं पत्नीवर कोयत्यानं हल्ला केला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती शिवाजी चव्हाण आणि त्याच्या पत्नीत नेहमीच वाद होत होते. याच विषयावरुन पती पत्नीला बेदम मारहाणही करत असे. घटना घडली त्या दिवशी नेहमीप्रमाणेच दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पतीनं पत्नीचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीनं विरोध केला आणि पतीला दूर लोटलं. काही केल्या पतीचा राग शांतच होईना. पत्नीनं दूर केल्यामुळे तो आणखीनच चिडला. त्यानं बाजूलाच पडलेला लोखंडी कोयता उचलून पत्नीच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथे घडली. या घटनेनंतर आरोपीनं पोफाळी पोलीस स्टेशन गाठून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
जयश्री शिवाजी चव्हाण असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचं नाव आहे. शिवाजी अवधुत चव्हाण असं आरोपी पतीचं नाव आहे. शिवाजी चव्हाण यानं कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती दिल्यावरुन ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी जखमी पत्नीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी नांदेड येथे घेऊन गेले. घटनास्थळावर रक्ताचा सडा होऊन बाजूलाच रक्तानं माखलेला लोखंडी कोयता आणि नायलॅान दोरी पडून होती. ते सर्व साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, जखमी पत्नीच्या जबाबावरुन पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कलम 307 भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार राजीव हाके करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























