Aurangabad Crime: आधी तरुणाला संपवलं, त्यानंतर हातपाय बांधून विहिरीत फेकलं; परिसरात खळबळ
Aurangabad Crime News: मृतदेह सापडलेला आकाश गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील रांजणगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकवीस वर्षीय युवकाचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहीरीत मृतदेह सापडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार घातपातचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आकाश वसंत मगरे (रा.रांजणगाव दांडगा, ता.पैठण) असे मृतकाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठणच्या रांजणगाव दांडगा येथील मगरे कुटुंबिय शेतवस्तीवर वास्तव्यास असुन रविवारी (ता.21) दुपारी वसंत मगरे यांचा एकवीस वर्षीय मुलगा आकाश मगरे हा घरातुन बेपत्ता झाला होता. सायंकाळी आकाश घरी न आल्याने त्याच्या कुंटुबियांनी त्याच्या ओळखीच्या आणि मित्रांकडून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही एक त्याची माहीती मिळाली नाही.
दरम्यान मंगळवारी घरालगत असलेल्या विहीरीतुन दुर्गंधी येत असल्याने कुटुंबियांनी विहीरीत डोकावून पाहीले असता पालथ्या अवस्थेत आकाशचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. रडण्याचा आवाज ऐकुन आजुबाजुच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेची पाचोड पोलिसांनी माहीती मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅा. विशाल नेहुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह
मात्र मृतदेह बाहेर काढल्यावर यावेळी आकाशाचे दोन्ही हात, दोन्ही पाय दोरीने बांधलेले तर कमरेलाही दोरीचा फासा दिलेला पाहायला मिळाले. तर त्याचे दातही पडलेले दिसल्याने हा प्रकार खून की आत्महत्या या विषयी संभ्रमाचे वातावरण आहे. सायंकाळी उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तुर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणुन घटनेची नोंद केली असून, पोलिसांनी बारकाईने तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी काही संशयास्पद वस्तु सापडून आल्या नाहीत. परंतु हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संशय उपस्थित केला जात आहे.
हत्येच्या दिशेने तपास?
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आकाशाचा मृतदेह घराजवळच असलेल्या विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण आकाशाचा मृतदेह बाहेर काढल्यावर त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले असल्याचे पाहायला मिळाले. सोबतच त्याच्या कंबरेला सुद्धा दोरी बांधलेली होती. त्यामुळे आकाशाने उडी मारून आत्महत्या केली की त्याचे हात-पाय बांधून त्याला विहिरीत फेकण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Bhondubaba : औरंगाबादच्या 'भोंदूबाबा'ची अखेर पोलिसांकडून चौकशी, जवाबही घेतला