Badlapur School: ज्या पक्षाची शाळा, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची सरकारी वकील म्हणून नियुक्ती कशी होते? उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर वडेट्टीवरांचा आक्षेप
Maharashtra Politics: बदलापूरच्या एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती.
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यक्तीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या राज्यामध्ये 11 तास त्या मुलींना बसवून ठेवले. त्या मुलीची गर्भवती आई बाकड्यावर झोपली होती. त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही. घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडत आहात. तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज 57% गुन्हात वाढ झाली. मागच्या सात महिन्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 57% वाढ होते, याचे उत्तर द्यायला नको. महिलांवर लाठीचार्ज करताना लाज वाटत नाही. 13 तारखेची घटना होते 16 तारखेला रिपोर्ट होतो. तुम्ही कारवाई करत नाही आणि संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
आंदोलनात विरोधक कुठे होते, विजय वडेट्टीवारांचा सवाल
बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात विरोधक कुठे होते, हे सरकारने सांगावे. आमदार बालाजी किणीकर म्हणतात, लाठीचार्ज करा. याप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घटना झाली, त्यांनीही राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. पोलीस यंत्रणा कुठे आहे? सरकार आहे कुठे? त्या शाळेमध्ये इतर सुद्धा तक्रारी येऊ शकतात. जनता रस्त्यावर येते आणि तुम्ही लोकांकडे बोट दाखवता. बालिकेवर अत्याचार झाल्याने वातावरण पेटले आहे. त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या. संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे . आता यात वकील कोण, तो सुद्धा त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेला? मग या प्रकरणात काय न्यायाची अपेक्षा करणार ? राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कायद्याची कडक अंमलबाजवणी करणं गरजेचं आहे. दबाव कोणी आणला याची चौकशी व्हावी, मोबाइल ट्रेस व्हायला हवेत, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
आणखी वाचा
बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेला 26ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापूरमध्ये दाखल