रावणवाडीत नवऱ्यानेच बायकोला संपवलं; पती-पत्नीच्या भांडणात दीड वर्षीय चिमुकला अनाथ
पती आणि पत्नीची भांडणं ही घरोघरी असतात. पण, पती-पत्नीच्या भांडणातून जीव घेण्याच्या धक्कादायक घटना अलिकडे सातत्याने ऐकायला किंवा वाचायला मिळत आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या (Police) हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आरती सुनिल पटले (30) रा. अंभोरा असे या घटनेतील मृतक पत्नीचे तर सुनील मदन पटले (35) रा. अंभोरा असे आरोपीचे नाव आहे. गुरुवार रात्रच्या सुमारास पती-पत्नी दोघांमध्ये किरकोळ वादावादी झाली. या दोघात झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सुनील याने घरात असलेल्या कुऱ्हाडीने आपली पत्नी आरतीवर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर, आरोपी पती स्वत:हून पोलीस (Gondia) ठाण्यात हजर झाला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती आणि पत्नीची भांडणं ही घरोघरी असतात. पण, पती-पत्नीच्या भांडणातून जीव घेण्याच्या धक्कादायक घटना अलिकडे सातत्याने ऐकायला किंवा वाचायला मिळत आहेत. त्यामध्ये, चारित्र्याच्या संशयावरुनच प्रामुख्याने भांडणं होत आहेत किंवा अनैतिक संबंध हेच या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दांपत्यास एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. गेल्या पाच वर्षापासून सुखाने नांदत असलेल्या सुनील आणि आरती यांच्यात चरित्राच्या संशयावरून गेल्या 6 महिन्यांपासून भांडण व्हायला सुरुवात झाली होती. सुनील पटले हा वारंवार आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता, ही बाब आरतीला खटकत होती. गेल्या काही दिवसांपासून याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते. गुरुवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.
दरम्यान, हत्येची घटना घडल्यावर सुनील पटलेने घटना स्थळावरून पळ काढला होता. मात्र, त्याने काही तासांनी स्वत: रावणवाडी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्या आणि अन्य आरोपांच्या खाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आणि सुनील पटलेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपास पोलीस निरीक्षक मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नवकार हे करीत आहेत.
हेही वाचा
ड्रोन हल्ल्यांना भारतेच चोख प्रत्त्युतर; गुरुवारी रात्री काय घडलं, पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे























