Gondia Crime News: गोंदिया गोळीबार प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या नऊवर मात्र; प्रकरणाचा मास्टरमाईंड अद्याप फरारच
Gondia Crime News: गोंदिया नगरपरिषदेचे माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबार प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकारणातील एकूण आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे.
Gondia News: गोंदिया (Gondiya) नगरपरिषदेचे माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबार प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या नऊवर पोहचली आहे. मात्र या प्रकरणतील मुख्य आरोपी आणि गोळीबारातील मास्टरमाईंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे गोंदिया पोलीस (Gondia Crime News) या प्रकरणात कसून चौकशी करत असून पकडण्यात आलेल्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोळीबार प्रकरणी नऊ आरोपींना अटक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू आणि माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर 11 जानेवारीला गोळीबार करण्यात आला होता. दिवसाढवळ्या गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत लोकेश यादव यांच्या कमरेला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी वेगाने आरोपीचा शोध सुरू केला. ज्यामध्ये सुरुवातीला चार आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्यानंतर या प्रकरणातील तपासाचे धागेदोरे पुढे सरकल्या नंतर आता पुन्हा पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 1 नग पिस्टल आणि 3 नग जिवंत काडतूस आढळून आले आहे. या सोबतच पोलिसांनी एकूण 2 मोटारसायकल आणि 4 मोबाईल फोन जप्त केले आहेत.
मास्टरमाईंड असलेला प्रशांत मेश्राम अद्याप फरार
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच 11 जानेवारीला लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर या प्रकारणतील मुख्य आरोपी आणि गोळीबारातील मास्टर माईंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी पत्रकार परिषद घेत, गोंदिया शहरांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे आणि गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी व्हावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. समाजाचे काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर असे दिवसाढवळ्या हल्ले होत असतील तर, सामान्य व्यक्ती खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न देखील पंकज यादव यांनी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या