Gadchiroli Naxal : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; माओवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेला मोठा शस्त्रसाठा केला नष्ट
Gadchiroli Naxal : नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha 2024) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात गेल्याकाही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा (Naxal) वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात पोलिसांनी देखील आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींकडे पोलीस लक्ष देऊन आहे.
आता मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी (Gadchiroli Police) मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोलीच्या टिपागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली मोठ्या प्रमाणात सुरंग पुरून ठेवले होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ही सर्व स्फोटके जप्त करत नष्ट केले आहेत.
माओवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली होती. या बाबतची विश्वासार्ह माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी तात्काळ त्या भागातील संबंधित क्षेत्राचे शोध अभियान राबविले. सोबतच सुरक्षा दलांची जोरदार तैनातीही या परिसरात करण्यात आली होती. त्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित आणि अचूक ठिकाण पोलिसांनी पाहणी केली. यात एका उंच डोंगरावर मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
9 आय.ई.डी आणि 3 क्लेमोर पाईप्स केले नष्ट
ही बाब उघड होताच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 2 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी-60 चे एक पथक, सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक आणि गरज पडल्यास हे स्फोटक नष्ट करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते. आज सकाळी जेव्हा ही सर्व पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 6 प्रेशर कुकरसह स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकड्यांनी भरलेले 3 क्लेमोर पाईप्स देखील सापडले.
तर उर्वरित 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. यावेळी पोलीस पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. या परिसरात आता पर्यंत एकुण 9 आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून नष्ट करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या