Gadchiroli Naxal : लाखोंचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक; गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
Gadchiroli Naxal : सुरक्षा दलाच्या नक्षलविरोधी (Naxal) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) यश मिळाले आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : सुरक्षा दलाच्या नक्षलविरोधी (Naxal) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) यश मिळाले आहे. अनेक हिंसक कारवायामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास अटक करण्यात आली आहे. सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा, (वय 23 वर्षे, रा. तोयामेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) अटक करण्यात आलेल्या कट्टर माओवाद्याचे (Maoist) नाव असून तो कट्टर माओवादी समर्थक आणि माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.
लाखोंचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यांला अटक
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवायांमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. तर प्रशासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 662 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे.
अशातच फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्या एका जहाल माओवाद्याला अटक करण्यात आली आहे.
अनेक नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभाग
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरिमिली हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबविले होते. दरम्यान, गस्तीवर असताना पोलिसाना या जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळुन आला. त्यानुसार विशेष अभियान पथकाने त्यास ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा (वय 23 वर्षे) असे असून तो कट्टर माओवादी समर्थक आणि माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तसेच त्याने 2023 रोजी मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस-माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 13/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 3,4 भास्फोका सहकलम 3/25, 5/27 भाहका सहकलम 135 मपोका सहकलम कलम 13, 16, 18 (अ), 20 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत, तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलिसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी अनेक कामे तो करीत होता.
दलममधील कार्यकाळ
साल 2020 पासून जनमिलिशीया सदस्य म्हणून काम करीत होता. दरम्यान गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे, तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.
- कार्यकाळात केलेले गुन्हे -07
- खुन – 01
- मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) येथील आगुळी वडदा नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
- चकमक – 3
- सन 2020-21 मध्ये मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सोनपूर जि. नारायणपूर (छ.ग.) पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन माओवाद्यांना ठार करण्यात पोलीस जवानांना यश आले होते.
- सन 2021 मध्ये मौजा दुरवडा जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन पोलीस जवान शहिद झाले होते. तसेच एक महिला माओवादी हीस ठार करण्यात पोलीस दलास यश आले होते.
- सन 2022 मध्ये मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
- इतर – 03
- सन 2020-21 मध्ये मौजा कोकामेटा जि. नारायणपूर (छ.ग.) गावातील छोटा पुलियावर झालेल्या ब्लास्टींगमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात 04 पोलीस जवान शहिद झाले होेते.
- मौजा मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
- मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
इतर महत्वाच्या बातम्या