भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याची आत्महत्या, मुंबईतील इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं
Mumbai Suicide News : अंधेरी पूर्वमधील हरिदर्शन इमारतीच्या टेरेसवरून सागर गुप्ता नावाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबई : भाजपचे माजी खासदार संगमलाल गुप्ता यांच्या पुतण्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागर रामकुमार गुप्ता (23 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंधेरी पूर्वेकडील हरिदर्शन इमारतीच्या टेरेसवरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. अंधेरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर गुप्ता कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. सागर गुप्ताने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सागर रामकुमार गुप्ता हा उत्तर प्रदेशचे माजी खासदार संगमलाल गुप्ता यांचा पुतण्या आहे. सागर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून तो अंधेरी (पूर्व) येथील अंबुजवाडी भागात असलेल्या हरीदर्शन भवनच्या सातव्या मजल्यावर राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गुप्ता दुपारी कॉलेजमधून घरी परतला. घरातील कोणाशीही न बोलता त्याने टेरेसवर जाऊन 'डक्ट एरिया'मधून उडी मारली. त्याचा मृतदेह काही प्रवाशांनी पाहिला आणि पोलिसांना कळवले. सागरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
सागरची कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सागर गुप्ता डिप्रेशनमध्ये होता की त्यामागे आणखी काही कारण होतं याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी पोलिस सागर गुप्ताच्या मित्रांची आणि त्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहेत.
ही बातमी वाचा: