(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जन्मदात्याला फसवणाऱ्या मुलावर बापानेचं केला गुन्हा दाखल
मुलाने बनावट कागदपत्रे वापरून वडिलांची खोटी स्वाक्षरी करुन कर्ज मंजूर करून घेतले आहे. वडिलांनी बोरवली पोलीस ठाण्यामध्ये मुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुलाला अद्याप अटक झाली नसून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
मुंबई : वयोवृद्ध वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर बनावट कागदपत्र, बनावट स्वाक्षरी करून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या मुलाच्या विरोधात मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. धक्कादायक म्हणजे कर्ज घेत असताना मुलाचे वडील हस्तीमल जैन हे गावी गेले होते आणि मुलाने मुंबईत बनावट कागदपत्रे वापरून कर्ज मंजूर करून घेतला आहे.
बोरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे हस्तीमल जेठमल जैन (77) यांनी काही महिन्यांपूर्वी बोरिवली पश्चिम येथील मोक्ष प्लाझा या ठिकाणी काही गाळे विकत घेतले होते . हस्तीमल जैन यांचा मुलगा प्रमोद याने त्याच्या वडिलांकडे येऊन सदरचे गाळे दुसऱ्याला भाड्याने देण्यापेक्षा मला द्यावे त्यामुळे मी माझा व्यवसाय सुरू करेन असे सांगितले. यावर मुलावर विश्वास ठेवत हस्तीमल ज्यांनी त्यांचे सर्व गाळे व्यवसाय करण्यासाठी दिले होते. लॉकडाउन काळामध्ये काही दिवसांसाठी हस्तीमल जैन हे त्यांच्या पत्नी सोबत पर्युषणचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या गावी गेले होते. मात्र परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या सदरचे गाळे सील करण्यात आल्याचं कळलं होतं. त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करून याबद्दल विचारले असता, कोरोनामुळे व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे लाईट बिल व मेंटेनेस भरता न आल्याने हे गाळे बंद करण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने त्यांना संगितले.
मात्र काही दिवसानंतर त्यांना त्यांच्या गाळ्यावर घेण्यात आलेल्या कर्जाची कागदपत्र मिळाली. धक्का बसलेल्या हस्तीमल जैन यांनी त्यांच्या मुलाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्या मुलाने आयडीएफसी बँक येथून वडिलांच्या नावावर बनावट कागदपत्र , स्वाक्षरी करून एक कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याबरोबरच रतन इंडिया फायनान्स कंपनी येथून 1 कोटी 53 लाख रुपयांचा कर्ज घेतल्याचे हस्तीमल जैन यांना कळल. आणि हस्तीमल यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कामासाठी पत्नीसोबत गावी गेल्यामुळे मुलाने या संधीचा फायदा घेत हस्तीमल जैन यांच्या नावावर बनावट कागदपत्र बनवून त्यांची स्वाक्षरी केली. बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून 2 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात हस्तीमल जैन यांनी बोरवली पोलीस ठाण्यामध्ये मुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुलाला अद्याप अटक झाली नसून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.