(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुन्या वादातून नातवाने आजोबांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून केलं ठार
जुन्या वादातून नातवाने आपल्या आजोबांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे.
धुळे : जून्या वादातून चुलत नातवाने आपल्या आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना धुळ्यात घडली आहे. घटनेनंतर नातू फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मात्र वार ग्रामस्थ सुन्न झाले होते. दरम्यान, फरार झालेल्या नातूचा पोलीस शोध घेत आहेत.
धुळे तालुक्यातील वार येथे आत्माराम हिरामण पारधी (68) हे पत्नी आणि चार मुले व चार सुना यांच्यासोबत राहतात. गावात त्यांच्या घराजवळ त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पवार-पारधी राहतो. आत्माराम पारधी यांच्या शेजारीच ज्ञानेश्वरच्या आजीचे घर आहे. त्यामुळे त्याचं तिथे नेहमी येणे-जाणे असायचे. नेहमीप्रमाणे आजीकडे ज्ञानेश्वर आला होता. त्यावेळी ज्ञानेश्वरने कौटुंबिक जुन्या वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी या आजोबांशी वाद घातला.
यावेळी संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरने आपल्या हातातील कोयत्याने थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर वार केले. यामुळे आत्माराम हे गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. रक्तश्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचेही पथक दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून संशयित ज्ञानेश्वर पवार-पारधी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फरार झाला असल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.