बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड; कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त, धुळ्यात मोठी कारवाई
Dhule Crime News : धुळ्यात एलसीबीच्या पथकाने बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली आहे. यात कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त करण्यात आला आहे.
Dhule Crime News धुळे : शहरातील वाडीभोकर परिसरात एलसीबीच्या (LCB) पथकाने आज एका घरावर धाड (Raid) टाकीत बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत बनावट दारुसह गांजाचा मोठा साठा पोलिसांनी (Police)हस्तगत केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात नाल्या किनारी एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने तत्काळ मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला.
कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त
यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे 200 लिटर स्पिरीटचा साठा पोलिसांच्या हाती लागला. शिवाय बनावट मद्याचे सात खोके ही आढळले. यासह पोलिसांनी या ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास 150 गोण्या भरून गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.
धुळ्यातील सात अट्टल गुन्हेगार हद्दपार
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील सात अट्टल गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिघांना धुळे जिल्ह्यातून, तर चौघांना खानदेशातून हद्दपार करण्याचा आदेश आहे. आगामी निवडणुका व सण-उत्सवाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांचे अभिलेख तपासून तरतुदीनुसार ही कारवाई झाली. अशोक रमेश पानथरे (23, रा. विद्यानगर, देवपूर, धुळे), राहुल ऊर्फ टाल्या गजानन थोरात (31, रा. रंगारी चाळ, धुळे), पापा गोल्डन ऊर्फ हाशिम हारून पिंजारी (27, रा. अंजनशाह सोसायटी, पूर्व हुडकोमागे, धुळे) याला धुळे जिल्ह्यातून, तर समीर गफ्फार शेख (24, रा. अंबिकानगर, शिरपूर), आदिल अलाद्दीन अल्ताप शेख (रा. महिना मोहल्ला, शिरपूर), दिलीप सुदाम कोळी ऊर्फ धाप दिल्या (रा. अंबिकानगर, शिरपूर) व अमृत आनंदा पाटील (रा. उपरपिंड, ता. शिरपूर) याला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांवर डल्ला
धुळे जिल्ह्यातील अमराळे (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास चोरट्यांनी दोन घरांतून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड अशा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्ह्य दाखल करण्यात आला.
आणखी वाचा
Nashik Crime : नाशकात आढळलेल्या मानवी कवट्या नेमक्या कुणाच्या? समोर आली मोठी अपडेट