(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Crime : पुन्हा एका हत्याकांडानं दिल्ली हादरली! एकाच घरात आढळले चार मृतदेह
Delhi Crime : श्रद्धा हत्याकांडानं आधीच हादरलेली दिल्ली पुन्हा एकदा हादरली. एकाच घरात आढळले चार मृतदेह.
Delhi Boy Killed Family Members: श्रद्धा वालकर हत्याकांडाचा (Shraddha Murder Case) खुलासा झाल्यानंतर देशाच्या राजधानीचं शहर असणारी दिल्ली (Delhi Crime) हादरली. घटनेच्या तपासात एकापाठोपाठ उलगडणाऱ्या गोष्टींनी थरकाप उडवून दिला. अशातच आता दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात एकाच घरात पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका मुलानं आपले आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजताच्या सुमारात पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे.
आरोपी मुलगा व्यसनाधीन असून तो सतत अमंली पदार्थांचं व्यसन करायचा. तसेच, नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख पटवली आहे. केशव असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 25 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अद्याप कोणतीची माहिती दिलेली नाही.
दिल्लीत एका घरात चार व्यक्तींचे मृतदेह आढळले. त्या मृत व्यक्तींची नावं खालीलप्रमाणे :
- आरोपीचे वडील 42 वर्षीय दिनेश कुमार
- आरोपीची आजी दीवानो देवी
- आरोपीची आई दर्शन सैनी (40)
- आरोपीची बहीण उर्वशी (22)
दिल्लीतील गुन्हेगारीचा वाढता आलेख
काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकाडांनं (Shraddha Murder Case) संपूर्ण देश हादरला. श्रद्धाची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबनं निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत फेकून दिले. श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबनंही आपला गुन्हाही कोर्टासमोर कबूल केला आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत. पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी न्यायालयानं आफताबच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे. काल (मंगळवारी) आफताबची पॉलिग्राफ टेस्टही करण्यात आली. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर दिल्लीतील अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे दिल्लीत गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :