Shraddha Murder: "आफताब मला मारुन टाकेल आणि तुकडे करुन फेकून देईल..." ; श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांना दिलेली माहिती
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकरने नोव्हेंबर 2020मध्ये आफताबविरोधात दिली होती पोलिसात तक्रार, गळा दाबून जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख, आफताबच्या कुटुबीयांना कल्पना असल्याचंही तक्रारीत नमूद
Shraddha Murder Case: देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये (Shraddha Murder Case) दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आफताबनं दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाहीतर त्यानं श्रद्धाला कापून टाकीन, अशी धमकीही दिली होती. दरम्यान, पण त्यावेळी आफताबचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नव्हता.
श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांकडे आफताब विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत श्रद्धानं लिहिलं होतं की, आफताबनं गळा दाबून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तसेच, कापून टाकीन, अशी धमकीही त्यानं दिल्याचा उल्लेख श्रद्धानं तक्रारीत केला होता. आफताब मला मारहाण करायचा आणि माझी हत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचं कुटुंबीयांनाही यासंदर्भात माहीत असल्याचाही उल्लेख श्रद्धानं तिच्या तक्रारीत केला होता.
श्रद्धानं लिहिलेल्या तक्रारीतून स्पष्ट होतं की, आफताबचे कुटुंबीयही आफताबची साथ देत होते. श्रद्धानं लिहिलं होतं की, "आफताबला त्याच्या कुटुंबीयांच पाठिंबा होता. आफताबचे कुटुंबीय सुट्ट्यांमध्ये आम्हाला भेटायला यायचे. मी त्याच्यासोबत राहायचे, कारण आम्ही लग्न करणार होतो. आफताब मला ब्लॅकमेल करायचा आणि मारण्याच्या धमक्या देतोय. मला काहीही झालं तरी त्याला जबाबदार आफताबच असेल."
श्रद्धा वालकर हत्याप्रकरण, आरोपी आफताबचं इन्स्टा चॅट समोर
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबचं आणखी एक चॅट समोर आलं आहे. श्रद्धा आणि त्याच्या कॉमन मित्रासोबतचं हे इन्स्टाग्राम चॅट आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनंतरचं हे चॅट आहे. मात्र या चॅटमध्ये श्रद्धाबाबत काहीच माहिती नसल्याचं आफताब या मित्राला भासवण्याचा प्रयत्न करतोय. आफताब आणि त्याच्या या मित्रामध्ये जवळपास 17 मिनिटं 33 सेकंद संभाषण होतं. या संपूर्ण संभाषणात श्रद्धा कुठे आहे? हे आपल्याला माहिती नाही असंच भासवण्याचा आफताब प्रयत्न करत असल्याचे उघड झालं आहे. मे महिन्यात आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती. मात्र श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचं आफताब या मित्रांना भासवत होता. आफताब आणि श्रद्धाच्या या कॉमन मित्रानं हे चॅट आता पोलिसांना दिलं आहे. पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवला आहे.
श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर : देवेंद्र फडणवीस
2020ला श्रद्धा वालकर हिनं जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होतं. ते पत्र माझ्याकडे पण आलं आहे. हे अत्यंत गंभीर पत्र होतं. पण त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? याची माहिती नाही. त्याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही... मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही. त्या बद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही. मात्र, याची चौकशी व्हायला हवी.