कसारा जंगलातील तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले; लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून प्रियकरानेच केली निर्घूण हत्या
Ceime News : ठाणे जिल्हातील कसारा ग्रामीण पोलिसांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कसारा नजीकच्या जंगल भागातील रस्त्याच्या कडेला एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तपासानंतर याबाबतचे गूढ उकलले आहे.
Ceime News : ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या जंगलात आढळेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून 22 वर्षीय तरुणीची प्रियकराने मित्राशी संगनमत करून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रिजवान, आणि अर्शद अशी हत्या केलेल्या दोघांची नावं असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केल्यानंतर 24 तासातच रिजवान आणि अर्शदला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जंगलात आढळून आला होता तरुणीचा मृतदेह
ठाणे जिल्हातील कसारा ग्रामीण पोलिसांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कसारा नजीकच्या जंगल भागातील रस्त्याच्या कडेला एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला होता.
मोबाईलमुळे पटली मृत तरुणीची ओळख
तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या अनेक जखमा पोलिसांना आढळून आल्या. त्यानंतर पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून कसारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाशेजारी मृत तरुणीचा मोबाईल पोलिसांना तपासादरम्यान आढळून आला. मात्र, मोबाईल फोन लॉक असल्याने खबरदारी म्हणून मोबाईलमधील डाटा सुरक्षित कसा काढता येईल यासाठी मोबाईल तज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक ओपन केल्याने मृत तरुणीची चार तासात ओळख पटली होती.
फुटेजवरून पटली आरोपीची ओळख
तरूणीची ओळख पटल्यानंतर कसारा प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप गितेंसह पोलिस उपनिरीक्षक सलमान आणि त्यांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. या पथकाने घटनांच्या दिवसापासून मुंबई आग्रा महामार्गवरील 5 ते 6 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामधील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृतक तरुणी आरोपी रिजवान आणि अर्शदसोबत दिसून आली होती. त्यानंतर फुटेजवरून आरोपीची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु केला असता. ते दोघेही भिवंडीत राहणारे असून सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.
वर्षभरापासून राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
कसारा पोलिसांच्या पथकाने स्थानिक भिवंडी पोलिसांची मदत घेऊन दोन्ही आरोपीना भिवंडी शहरातील अवचित पाडा भागात शिताफीने सापळा रचून अटक केली. अटक केलेल्या आरोपी पैकी रिजवानसोबत मृत तरुणी गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भिवंडीत राहत होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनमधूनच दोघांमध्ये लहानसान वादातून खटके उडायचे. त्यामुळे आरोपी प्रियकर रिजवानने तरुणीच्या हत्येचा कट त्याचा मित्र अर्शदशी संगनमत करून रचला होता.
फिरण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि केली निर्घृण हत्या
घटनेच्या दिवशी मृत तरुणीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून वारलीपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्यावर आणले. त्यानंतर याच ठिकाणी तिच्यावर चाकूने अनेक वार करून तिची निर्घृण हत्या करून दोघेही घटनस्थळावरून पसार झाले होते. मात्र, कसारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोपींना 24 तासातच शिताफीने शोध घेऊन अटक केली, अशी माहिती कसारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गीते यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास कसारा पोलिस करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या