सायबर चोरट्यांचा धोका वाढला, नेमकी कशी होते फसवणूक? या घटनांपासून वाचण्यासाठी काय करावं?
Cyber Crime News : सायबर चोरट्यांच्या धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात सध्या डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) या सायबर चोरट्यांच्या घटनांमुळं पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
Cyber Crime News : देशात डिजिटल सेवेचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करताना पहायला मिळत आहेत. वस्तू खरेदीपासून ते बिलं भरण्यापर्यंत घर बसल्या नागरिक ऑनलाईन गोष्टी हाताळताना पाहायला मिळत आहेत. यामुळं नागरिकांचा वेळ आणि काम जरी सोपं झालं असलं तरी सायबर चोरट्यांच्या धोकाही तितकाच वाढला आहे. राज्यात सध्या डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) या सायबर चोरट्यांच्या घटनांमुळं पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मुंबई पोलिसांकडे ऑक्टोबर 2024 पर्यंत 102 अशा प्रकारच्या घटनाची नोंद झाली आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
देशात सध्या ED, CBI, NCB किंवा पोलिस यांच्या नावाने सायबर चोरटे नागरिकांना व्हिडिओ कॉल करतात. त्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्यची भिती दाखवतात. तर कधी व्हिडिओ कॉलद्वारे फोन करून बराच वेळ ती व्यक्ती तुम्हाला व्हॉट्स अप किंवा स्काइप कॉलवर रहायला सांगतात. त्यावेळी ते तुम्हाला अटक करण्याची भिती घालतात. तसेच या गुन्ह्यात त्याचा कसा सहभाग आहे हे सांगून विविध कारणे सांगून नागरिकांचे पर्सनल डिटेल्स मागून घेतात किंवा नागरिकांना भिती घालून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
वृद्ध दांपत्यांकडून 1 कोटी 33 लाख उकळल्याची धक्कादायक घटना
मुंबईच्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या वृद्ध दांपत्यांसोबत नुकतीच अशी एक घटना घडली आहे. या दांपत्यांना सायबर चोरट्यांनी त्यांना 500 कोटीच्या मनी लॉड्रींग गुन्ह्यांत सहभाग असल्याचे सांगून त्या वृद्ध दांपत्यांकडून 1 कोटी 33 लाख उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरट्यांनी या वृद्ध दांपत्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठव्यात RBI मधून बोलत असल्याचे सांगून संपर्क केला होता. यावेळी त्यांनी वृद्ध दांपत्यांना त्यांचे खात्याशी संबधित लिंक असलेल्या मोबाइल 500 कोटीच्या फसवणूक प्रकरणाशी संबधित असल्याचे सांगितले. तसेच ही रक्कम दहशतवादी कारवाईसाठी वापरण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणाना असल्याचे सांगून वृद्ध दांपत्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर वृद्ध दांपत्यांना विश्वास बसावा या अनुशंगाने मनी लॉड्रींग प्रकरणी बॅकेची खोटी नोटीसही पाठवली. त्यानंतर वृद्ध दांपत्यांना हैद्राबाद पोलिसांकडून बोलत असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीला सहकार्य करण्याबाबत दबाव टाकला गेला. अनेकदा हे आरोपी तथाकथित गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल तर पैशाची मागणी केली जाते. समोरचा व्यक्ती म्हणतो की पैसे पाठवा म्हणजे केस करणार नाही. इतकच काय तर नागरिकांना विश्ववास बसावा यासाठी व्हिडिओ कॉलवर पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेला असतो. अगदी पोलीस ठाण्यासारखं वातावरणसुद्धा असतं. मग लोक घाबरून पैसे पाठवतात आणि तिथे घोटाळेबाजांचा उद्देश साध्य झालेला असतो.
वृद्ध महिलेची 35 लाखांची FD ही मोडण्यास आरोपींनी दबाव टाकला
गोरेगावमधील घटनेत वृद्ध दांपत्यांचे खाते आरोपी सांगत असलेल्या बॅकेत नसून सुद्धा त्या खात्याशी आपला मोबाइल लिंक असल्याचे सांगून भिती घालत होते. तसेच खात्यात असलेली जमापुंजी ही इतर खात्यात वळवावी ज्याने करुन ती बुडणार नाही अशा सहानभूतीच्या गप्पा करून आरोपीनी दिलेल्या खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर त्याच बॅकेत असलेली वृद्ध महिलेची 35 लाखांची FD ही मोडण्यास आरोपींनी दबाव टाकला. महिला ज्यावेळी FD मोडण्यास बॅकेत गेली. त्यावेळी निवडणुका सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचं कारण देऊन बॅकेतील कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेस दोन दिवसांनी बोलावले. पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढून तिच्यासोबत फसवणूक झाल्याचे सांगितल्यानंतर त्या महिलेच्या पायाखालची जमिन सरकली. मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असे प्रकार आल्या दिवशी घडताना पहायला मिळत आहेत. पोलिसांकडे ऑक्टोबर 2024 पर्यंत अशा प्रकारच्या 102 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अशा घटनांपासून वाचण्यासाठी काय करावं?
डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणीही अशा प्रकारे अटक करू शकत नाही. असा कोणत्याही तपास यंत्रणेकडून बोलत असल्याचे सांगितल्यास त्याची खात्री संबधित विभागात जाऊन स्वत: घ्यावी. किंवा थेट पोलिसांशी संपर्क करून मदत घ्यावी. प्रत्येक राज्यासाठी वेगळा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. त्यामुळे फोनवरुनही तक्रार नोंदवू शकता.