(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या चार महिला गजाआड; सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
मुंबईतील भायखळा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फोटेज पाहिल्यानंतर चार महिलांनी चोरी केल्याचं लक्षात आलं.
मुंबई : भायखळा परिसरात निलेश जैन यांच्या शिवम ज्वेलर्समध्ये चार महिलांनीच दिवसाढवळ्या चोरी केली. या चारही महिला बुरखा घालून आल्या होत्या आणि इतक्या हात सफाईने त्यांनी चोरी केली की, निलेश यांना ते कळल नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर निलेश जैन यांना आपल्या दुकानात चोरी झाली हे लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ भायखळा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत क्षणाचा ही विलंब न करता तपास सुरु केला. चोरी इतकी हात सफाईने केली गेली होती की, दुकानाचे मालक निलेश जैन आणि त्यांचा कर्मचारी जे त्या महिलांना दागिने दाखवत होते त्यांच्या ही लक्ष्यात आले नाही की, चोरी झाली. सीसीटीव्हीमधून चोरी झाल्याचे कळाले.
तपास सुरु केल्यानंतर पोलिसांना कळलं या चारही महिला मालेगाव नाशिक या ठिकाणच्या आहेत. भायखळा पोलीस स्टेशनमधील एक पथक मालेगाव नाशिक या ठिकाणी दाखल झालं. मालेगावला गेल्यावर पोलिसांना कळलं की, या चारही महिला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत आणि याच स्विफ्ट गाडीचा वापर गुन्हा करण्यासाठीसुद्धा या महिलांकडून केला गेल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली.
भायखळा पोलीसांनी दोन पथकं तयार केली. त्यांना मुंबईच्या 2 वेगवेगळ्या टोल नाक्यांवर तैनात करण्यात आलं. मुलुंड टोल नाक्यावर तैनात असलेल्या एका पथकाला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी दिसून आली. ज्यामध्ये या चार बुरखाधारी महिला बसल्या होत्या. या चारही महिलांना भायखळा पोलिसांनी अटक करून ती गाडी ताब्यात घेतली. भायखळा येथील शिवम ज्वेलर्समध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली या चारही महिलांनी तर दिलीच मात्र आधी सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे या महिलांवर दाखल असल्याचंही समोर आलं.
अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावं साजदा उर्फ अनु बशीर अन्सारी वय 30, नाजीया इजरायल शेख वय 30, नसरीन बशीर शेख वय 50, यास्मिन अझरुद्दीन खान वय 35, अशी असून यांच्यावर चिखली पोलीस ठाणे बुलढाणा दिंडोरी नाशिक पोलीस ठाणे, नवापूर पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, भांडुप पोलीस ठाणे, कुर्ला पोलीस ठाणे, मिरज चौक हैदराबाद, या सर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून या आरोपींनी वाशी, वडाळा, कुर्ला, शिवडी, ठाणे, भिवंडी या परिसरामध्ये देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे देखील कबूल केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण , पोलीस उप आयुक्त श्री परमजीतसिह दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विनय गोडबोले , वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि संतोष कांबळे, पो.उ.नि रूपेश , पो.उ.प.नि खरमाटे, पो.उप.नि दत्ता जाधव, पो.शि साताळकर, ठाकूर ,संजय पाटील, जयवंत पाटील या पथकाकडून करण्यात आलं आहे.