Chhattisgarh News : 10 लाखांचं बक्षीस असणारा नक्षलवादी ठार, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद
Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत नक्षलवादी ठार झाला असून एक जवान शहीद झाला आहे.
Chhattisgarh Crime News : नक्षलवादी (Naxal) आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली असून यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत 10 लाख बक्षीस असलेला एक नक्षली ठार झाला तर एक जवान शहीद झाला आहे. छोटेबेठिया भागातील हिंदूरच्या जंगलात चकमक झाल्याची माहिती आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक
छत्तीसगढ राज्याच्या कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिदूरच्या जंगलात माओवाद्यांची उपस्थिती असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नक्षलवाद्याला कंठस्नान घातलं आहे. हिदूरच्या जंगलात नक्षली हालचालीची माहिती सुत्रांकडून मिळाल्यानंतर रविवारी पोलीस दल कारवाईसाठी रवाना झाले होते. यानंतर शोध मोहिमेदरम्यान पोलीस आणि नक्षल वाद्यांमध्ये चकमक झाली.
एक नक्षलवादी ठार तर, एक जवान शहीद
शोध मोहिमेदरम्यान हिदूरच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली, सुमारे एक तास ही चकमक सुरू होती. कांकेर डीआरजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. चकमकी नंतर घटनास्थळी मोठया प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आलं आहे.
माओवाद्याचा मृतदेह आणि एक AK-47 जप्त
दरम्यान, पोलीस दल, BSF, DRG कडून आजूबाजूच्या परिसरात शोधकार्य सुरू असताना गणवेशधारी माओवाद्याचा मृतदेह आणि एक AK-47 जप्त करण्यात आली आहे. बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी चकमकीत शहीद झाले. चकमकीच्या ठिकाणाभोवती शोध मोहीम सुरू आहे. चकमकीत बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी हे गोळी लागल्याने शहीद झाले आहेत.
आजूबाजूच्या परिसरात शोधकार्य सुरू
या चकमकीत झडतीदरम्यान, गणवेशधारी पुरुष माओवाद्याचा मृतदेह सापडला, ज्याची ओळख परतापूर एलजीएस कमांडर ACM नागेश, कोडलियार पोलीस स्टेशन कोहकामेट्टा जिल्हा नारायणपूर येथील रहिवासी आहे. माओवादी एलजीएस कमांडर एसीएम नागेशवर याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात तीन नक्षलवादी ठार
गेल्या आठवड्यात घडलेल्या आणखी एका घटनेत छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी सांगितलं की, 'जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना कोयालीबेडा भागातील जंगलात आमनेसामने झाली.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :