पार्सल देण्यास उशीर झाला म्हणत पोलिसांनीच डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, ओठ फाटला, अंगावर व्रण, कर्मचाऱ्यावर गुन्हा
या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्लिपकार्टची डिलिव्हरी देण्यास उशीर झाल्यानं पोलिसांनीच डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉयचा ओठ फुटला असून त्याच्या अंगावर मारहाणीचे वणही आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जीवन शेजवल असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलिसांनी या मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला निलंबित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नक्की झाले काय?
ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंचे पार्सल देण्यास उशीर झाला म्हणून डिलिव्हरी बॉयला एका पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी झाली असून त्याचे ओठ फाटले आहेत. अंगांवर मारहाणीचे वणही आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात जितेंद्र नावाचा हा तरुण वर्तमानपत्र विक्रेता आहे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून दुसऱ्या बाजूला तो फ्लिपकार्ट कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करतो. सिडको पोलीस ठाण्यातून कर्मचारी जीवन शेजवल यांनी काही वस्तू मागवल्या होत्या. या वस्तू घेऊन सोमवारी दुपारी डिलिव्हरी बॉय गेला असता पार्सल देण्यास इतका उशीर का झाला असे म्हणत सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी जीवन शेजवल यांनी लाठ्यांनी मारहाण करत हाताने चापटा मारत गंभीर जखमी केले.
डिलिव्हरी बॉयचे अंग सुजले, ओठही फाटला
या मारहाणीत डिलिव्हरी बॉयचे अंग सुजले असून पायावर आणि हातावर लाठीने मारहाण केल्यानंतरचे व्रणही आहेत. डोक्यात देखील गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या डिलिव्हरी बॉयला मुका मारही बराच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची वरिष्ठांनी दखल घेतली असून जीवन शेजवाल या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यावर निलंबन करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा: