Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीतील थरारक घटना
Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा. या गुन्ह्यातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar crime news: छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत (Police Encounter) ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर (Amol Khotkar) या संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला. वाळूज परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Police Crime branch) मिळाली होती. त्यानुसार सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले.
पोलिसांचे पथक याठिकाणी पोहोचले तेव्हा अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार (Firing on police) सुरु केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या एन्काऊंटरबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. हा एन्काऊंटर कसा झाला, याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे.
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. त्यावेळी संतोष लड्डा हे कुटुंबीयांसह परदेशात गेले होते. संतोष लड्डा यांचा केअरटेकर बंगल्यात होता. दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोने आणि चांदी लुटून नेली होती. या दरोड्यात लड्डा यांच्या घरातील आठ किलो सोने (Gold) आणि 40 किलो चांदी (Silver) , तसेच रोख रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर पाच आरोपींना अटक केली होती. अमोल खोतकर हा सहावा आरोपी होता. त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याला अटक करायला गेले होते. मात्र, अमोल खोतकर पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. अलीकडेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर आता अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा

























