राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
चंद्रपूरच्या नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे. नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.
Chandrapur Crime News : बदलापूर (Badlapur School Abuse Case) येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यात आता चंद्रपूरच्या नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार (Sexual Abuse) झाल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे.
नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. 12 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली असून घटनेतील आरोपीच्या सहकाऱ्यांनी चक्क व्हिडीओ देखील चित्रित केला आहे. हा व्हिडिओ आज समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.
'त्या' कृत्याचा व्हिडीओही चित्रित, 5 आरोपी पोलिसांनी ताब्यात
या संतापजनक प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. तर यातील आरोपिंना कठोर शिक्षेची मागणी करत पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या व्हिडीओची तपासणी करून मुलीचा आणि यातील आरोपींचा शोध घेतला असता, या प्रकरणात सामील 5 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सध्या जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मुंबईत अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार
बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील कामावर गेले होते, त्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने तिच्या घरात घुसून मुलीचा विनयभंग केला. यानंतर पीडित मुलगी घाबरली, काही दिवस मुलगी शांत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले, आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता. तिने घडलेला प्रकार सांगितला पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास गोरे आहे.
हे ही वाचा