(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Bhiwandi Crime : भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका चिमुकलीनं आपला जीव गमावला आहे. याप्रकरणावरुन भिवंडी शहरात संतापाची लाट उसळली आहे.
Bhiwandi Crime : ठाणे : भिवंडीतील पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक भिवंडी शहरात पिसळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढ होत चालली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, दोन दिवसांत 135 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. यापैकी चार वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. चिमुकलीच्या मृत्यूनंतर भिवंडी परिसरात संतापाची लाट उसळली असून भिवंडी शहरात पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारे श्वान निर्भजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची हजारोच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
भिवंडी (Bhiwandi Crime) शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होतो. या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसाळल्यानं अनेकांचा चावा घेतल्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागल्या आहेत. 7 आणि 8 जुलै या दोन दिवसांत तब्बल 135 जणांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक लहान मुलामुलींचा समावेश आहे. त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर होती. खळबळजनक बाब म्हणजे, गेल्या जून महिन्यामधील तीस दिवसांत 886 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याची माहिती इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.
चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?
7 जुलै रोजी भिवंडी शहरातल्या कामतघर परिसरात 60 नागरिकांना भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं. तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी 45 जणांना एकाच भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं. या गंभीर जखमीमध्ये शांतीनगर भागात राहणाऱ्या लायबा शेख या चार वर्षीय मुलीचा समावेश होता. सुरुवातीला तिला भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं दुसऱ्या दिवशी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिच्यावर जखमांच्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिला तीन दिवसांत घरी सोडण्यात आलं. मात्र तीन दिवसांपूर्वीच तिची पुन्हा प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र 25 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेक यांनी 8 जुलै रोजी म्हणजेच, घटनेच्या दिवशी पावसाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यावर पालिका काहीच उपाययोजना करत नसल्यानं प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात चर्चा होऊन पालिकेला उपाययोजनेसाठी निर्देशही दिल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. मात्र, त्यावर काहीच उपाययोजना पालिका अधिकाऱ्यांनी केल्या नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी 27 ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर मयत मुलीचे आजोबा यांनी यापूर्वीही पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्याला आळा घालण्यासाठी निवेदन दिलं होतं. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्यानं माझ्या नातीला कुत्र्यानं चावा घेऊन मारलं तसेच ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नातीवर योग्य उपचार येथील डॉक्टरांनी केले नसल्यानंच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.