भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
आरोपी भावेश भिंडेंला विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी, आरोपीच्यावतीने वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे.
मुंबई : राजधानी मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Rain) धुमाकूळ घातला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईकरांचा जनजीवन काही वेळेसाठी विस्कळीत झालं होतं. मात्र, याच दिवशी घाटकोपर दुर्घटनेतून (Ghatkopar) मोठी मनुष्यहानी झाली. येथील बॅनर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे. त्यानंतर, भावेशला आज न्यायालयात (Court) हजर करण्यात आलं. यावेळी, भावेशचे वकिल रिझवान मर्चंट यांनी वादळी युक्तिवाद करत पोलिसांनी चुकीचे कलम लावल्याचे म्हटले. तसेच, आरोपीविरुद्ध चुकीचे कलम लावण्यात आले असून चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचंही त्यांनी न्यायलयात म्हटले. दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेवरुन आता राजकारणही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोपी भावेश भिंडेंला विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी, आरोपीच्यावतीने वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. ''घटनेच्या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 96 किलोमीटर इतका प्रचंड होता, नॉर्मली वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका असतो. त्यामुळे, वाऱ्याचा वेग इतका अधिक असल्यास अधिकारीही हे मान्य करतात की अशावेळी नैसर्गिक दुर्घटना किंवा अशा घटना घडू शकतात. याचदरम्यान, वडाळा येथेही लोखंडी पार्किंगचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी तिथ कलम 304 लावलं नाही. फक्त याच गुन्ह्यात कलम 304 लावलं, कारण इथे मोठी जीवितहानी झालेली आहे,'' असा वादळी युक्तिवाद घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केला आहे.
304 कलम लागू शकत नाही
या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं, त्यावेळी होर्डिंगचं स्ट्रक्चर हे उत्तम दर्जाचं असल्याचा अहवाल 2023 मधील आहे. अहवालात होर्डिंगची उंची लांबी रुंदी आणि इतर गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत,असा युक्तिवाद आरोपीचे वकिल रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात केला आहे. तसेच, या गुन्ह्यात 304 हे कलम लागू शकत नाही. तर, आरोपीला अटक करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा युक्तिवादही रिजवान मर्चंट यांनी केला.
उदयपूरमधून अटक
दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागताच, भावेश भिंडे स्वतःच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला. त्यानंतर तो लोणावळ्यात एका खासगी बंगल्यात काही तासांसाठी थांबला होता. पोलीस आपल्या मागावर आहेत, याचा भावेशला अंदाज होता. त्याने ड्रायव्हरला नवीन सीमकार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि तासाभराने भिंडे एकटाच लोणावळ्याच्या बंगल्यातून निघून गेला. लोणावळ्यातून भिंडे अहमदाबादला एका नातेवाईकाच्या घरी मुक्कामाला थांबला. त्यानंतर भावेश भिंडे राजस्थानमधून जयपूरमध्ये गेला. जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये भावेश भिंडे याने स्वतःच्या भाच्याच्या नावाने रुमही बुक केली होती, तिथेच तो लपला होता. भिंडेला याच हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेची सहा ते सात पथकं राजस्थान, जयपूर, अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती. अखेर मुंबई पोलिसांनी उदयपूरच्या हॉटेलमध्ये भावेश भिंडेला पकडले.