Beed Crime : NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
Beed Crime : छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजुळ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime : राष्ट्रवादीचे छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (Vikram kale) यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजुळ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांची तब्बल 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शेजुळवर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नयन शेजुळ याने आमदार निधीतून किंवा जिल्हा परिषदेमार्फत काम मिळवून देतो, असे सांगून सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांच्याकडून 6.70 लाख रुपये घेतले. मात्र, पैसे मिळाल्यानंतरही शेजुळ याने कोणतेही काम न देता सतत टाळाटाळ केली. फसवणुकीदरम्यान शेजुळ याने बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे खताळ यांना विश्वासात घेतले. या ई-मेलमध्ये काम मंजूर झाल्याचे खोटे दाखवून त्यांनी रकमेची मागणी केली होती. विश्वास ठेवून खताळ यांनी पैसे दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम मंजूर झाले नव्हते, हे पुढे उघडकीस आले.
पोलिसांत गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तरेश्वर खताळ यांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठले आणि शेजुळविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदाराच्या स्वीय सहाय्यकावरच फसवणुकीचा आरोप झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आमदार विक्रम काळे यांची या प्रकरणावर भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये सरपंचाला लाच घेताना पकडले रंगेहाथ
दरम्यान, बीडच्या माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडलेय. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















