Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच, चक्क पोलिस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार
Santosh Deshmukh Murder Case : दारू प्यायला नकार दिल्यानंतर वादावादी झाली आणि शिवीगाळ करण्यात आली. त्यावरून राग आल्यानंतर चौघा तरुणांनी एकावर चाकू आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली.
बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड पोलिस प्रशासनाची तक्तरे वेशीवर मांडली जात असतानात अशा गुन्हेगारी घटना मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीत. बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दर्शविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाजवळील पोलिस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
जमीरचा भाऊ शेख मतीनने दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीहरी मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. यावेळी जमीरने त्यास नकार देऊन त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर गुरूवारी रात्री 12.30 वाजता जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले.
जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला. आरोपीसोबत असलेल्या आर्यन मांदळे आणि इतर दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे आणि इतर दोन अनोळखी तरुणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
बीड जिल्ह्यात 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना
जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 36 खून झाल्याची नोंद आहे. यात परळीतील सरपंचाच्या खुनाचाही समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) नेत्याचाही समावेश होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा नेता अद्यापही एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही. तसेच खून करण्याचा प्रयत्न केल्याच्याही 168 घटनाही घडलेल्या आहेत.
गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यांत दाखल आहेत. यातील 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत..याशिवाय 156 अत्याचाराच्या 386 विनयभंग झाल्याच्या घटना देखील या कालावधीत समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात महिला, मुली देखील सुरक्षित नाहीत. 10 महिन्यांत अत्याचाराच्या 156 तर विनयभंग, छेडछाडीच्या 386 घटना घडल्या आहेत.
ही बातमी वाचा: