(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Who is Akshay Shinde : बदलापुरात चिमुकल्या कळ्या ओरबडणारा नराधम, कोण आहे अक्षय शिंदे?
Who is Badlapur crime accused Akshay Shinde : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन चिमुरड्यांवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
ठाणे : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
कोण आहे अक्षय शिंदे?
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती.
शाळेत 1200 च्या आसपास विद्यार्थी
ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200 च्या आसपास आहे.
आरोपी अक्षय शिंदेकडे काय जबाबदारी होती?
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय 24 वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले.
लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला?
दोन पीडित मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आला. यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले.
प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाणार
दरम्यान, या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल, तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा :