Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Baba Siddique died in gunshot: बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांबद्दल नवी माहिती. कुर्ल्याच्या पटेल चाळीतील रहिवाशांनी सांगितलं आरोप कसे वागायचे?
मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी शनिवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) गुंडांनी हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांबद्दलची माहिती समोर येत आहे. सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांनी मुंबई उपनगरात असणाऱ्या कुर्ला येथे पटेल चाळीत एक खोली भाड्याने घेतली होती. तिन्ही मारेकरी याच ठिकाणी राहत होते.
शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह (Gurmel Singh) हे तिघेही 2 सप्टेंबरपासून पटेल चाळीत भाड्याने राहायला आले होते. येथील 225 क्रमांकाच्या खोलीत हे तिघे राहत होते. या तिघांनी या खोलीसाठी तब्बल 14 हजार रुपये भाडे मोजले होते. येथील प्रचलित भाड्यापेक्षा ही रक्कम जास्त होती. मात्र, या तिघांनी एका एजंटमार्फत घरमालकाला दुप्पट भाडे दिले होते. हे तिघेही आजुबाजूच्या रहिवाशांसोबत आदराने वागायचे, अशी माहिती येथील एका रहिवाशाने दिली.
मारेकऱ्यांपैकी एक असणारा गुरमेल अनेकदा चाळीच्या परिसरात सिगरेट पीत मोबाईलवर बोलत फिरायचा. तो लहान मुलांशी इंग्रजीत बोलायचा. तो बऱ्याचदा शेजाऱ्यांकडे असलेल्या पाळीव कुत्र्याशी खेळायचा. या तिघांची आर्थिक परिस्थिती चांगली वाटत असल्याने चाळीतील रहिवाशांना हे तिघे गुन्हेगार असतील, याचा थोडाही संशय आला नाही. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या तिघांचे चेहरे टेलिव्हिनजच्या स्क्रीनवर झळकायला लागले तेव्हा पटेल चाळीतील लोकांना धक्का बसला.
या घटनेनंतर पटेल चाळीतील मारेकरी राहत असलेल्या खोलीला टाळे ठोकले आहे. नागरिकांना खिडकीतून घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान दिसत आहे. गाद्या, कपडे,चपला, पाणी आणि शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या खोलीत पडून आहेत. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह, प्रवीण लोणकर या तिघांना अटक केली आहे. तर शिवकुमार अद्याप फरार आहे. तो राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
शिवकुमारने घर भाड्याने घेतले
शिवकुमार याने कुर्ला परिसरात दलालासोबत फिरुन घर भाड्याने घेतले होते. सगळ्यात प्रथम तो पटेल चाळीत राहायला आला. त्यानंतर धर्मराज कश्यप आणि शेवटी गुरमेल सिंह पटेल चाळीत राहायला आला. गुरुमेल आणि शिवकुमार यांच्याकडे गोळीबार करण्याची जबाबदारी होती. तर धर्मराज कश्यप याच्याकडे गोळीबारानंतर खाज येणारा स्प्रे मारण्याची जबाबदारी होती.
आरोपींना फक्त टार्गेटची माहिती
बाबा सिद्दीकी हे झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडताच शिवकुमारने अंदाधुंद गोळीबार केला होता. यापैकी तीन गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या होत्या. साधारण सात फुट अंतरावरुन शिवकुमारने सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर धर्मराजने मिरची स्प्रे मारला होता. या आरोपींना फक्त बाबा सिद्दीकी यांना मारायचे आहे, इतकीच माहिती देण्यात आली होती. मात्र, या सगळ्यामागे कोण आहे, याबद्दल आरोपींना कोणतीही माहिती नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
तसेच बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी आरोपींना कोणतीही रक्कम ठरवून देण्यात आली नव्हती. 'काम होने दो, बडी अमाउंट मिलेगी', एवढचे आरोपींना सांगून त्यांना बाबा सिद्दीकी यांचा फोटो आणि फ्लेक्स देण्यात आला होता.
आणखी वाचा
बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपींनी सलमान खानच्या घराचीही केली होती रेकी; धक्कादायक माहिती आली समोर