(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पिस्तुल्याभाई'ला पोलिसांनी शिकवला धडा; हातात शस्त्र असलेल्या फोटोंची केली होती बॅनरबाजी
Aurangabad Crime News : हातात पिस्तुलासारखे शस्त्र असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्यावर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे.
Aurangabad Crime News : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात चौका-चौकात राजकीय पक्षाचे, संघटनांचे, तथाकथित भाईंकडून बॅनरबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीतरी अधूनमधून छोट्या-मोठ्या कारवाई होत असल्याने आणि प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याने हे प्रमाण अधिकच वाढले आहे. आता मजल इथपर्यंत गेली आहे की, हातात शस्त्र असलेल्या फोटोंचे होर्डिंग बिनधास्तपणे लावण्यात येत आहे. अशाच एका तथाकथित 'पिस्तुल्याभाई'ला पोलिसांनी धडा शिकवला आहे. हातात पिस्तुलासारखे शस्त्र असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्यावर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे.
हातात पिस्तुलासारखे शस्त्र असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्या कथाकथित पिस्तुल्या भाईला जवाहरनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी हे बॅनर काढले असून, या भाईसह त्याला शुभेच्छा देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री) आणि माया भाई ऊर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथनगर, विजय चौक, गारखेडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे देखील फोटो पाहायला मिळाले.
दरम्यान, या प्रकरणी जवाहरनगरचे पोलिस नाईक पुंडलिक विनायक मानकापे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात, गजानन महाराज चौकात प्रशांत सासवडे याला शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर सासवडे याचा माया भाई असा उल्लेख केलेला होता. एवढच नाही तर त्याच्या हातात पिस्तुलासारखे शस्त्र असल्याचे फोटो देखील बॅनरवर पाहायला मिळत होते. तर बॅनरवर संतोष थोरात याचा शुभेच्छुक म्हणून उल्लेख आहे. विशेष म्हणजे, दोघेही शहरातील एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. तर भर चौकात लावण्यात आलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती.
अशी झाली कारवाई...
दरम्यान, या बॅनरची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीररीत्या गजानन महाराज चौकात सार्वजनिक रस्त्याला लागून वाढदिवसांचे शुभेच्छा देणारे बॅनर देणारे बॅनर लावण्यात अल्के होते. ज्यात शस्त्र सदृश्य वस्तू हातात दिसुन येत आहे. असे बॅनर लावुन सार्वजनिक रस्त्याचे विद्रूपीकरण करुन औरंगाबाद पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने या दोन्ही आरोपींच्या विरोधात भा.द.वी कलम 188 भा.द.वी सहकलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135,सहकलम महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: