Ambernath Crime : बायको सोडून गेल्याने टोमणे मारणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या
Ambernath Crime : बायको सोडून गेल्यानंतर बापाकडून मारले जाणारे टोमणे आणि मानसिक त्रास याला वैतागून मुलाने बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे.
Ambernath Crime : बायको सोडून गेल्यानंतर टोमणे मारणाऱ्या बापाची (Father) त्याच्या पोटच्या मुलाने (Son) हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) शहरात घडला आहे. बापाकडून मारले जाणारे टोमणे आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास याला वैतागून मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं. देविदास किसन सूर्यवंशी असं मृत वडिलांचं नाव आहे. तर प्रकाश सूर्यवंशी असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलाची बायको सोडून गेल्याने बापाकडून टोमणे
अंबरनाथच्या दत्तकुटीर भागात देविदास किसन सूर्यवंशी (वय 60 वर्षे) हे परिवारासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा प्रकाश सूर्यवंशी हा रिक्षा चालवण्याचं काम करतो. प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत. मात्र त्याची बायको काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली. याच कारणावरुन देविदास हे त्यांचा मुलगा प्रकाश याला सतत टोमणे मारत होते तसंच घालून पाडून बोलत असत.
मानसिक त्रास असह्य झाल्याने मारहाण
बापाकडून होणारा हा मानसिक त्रास प्रकाशला असह्य होत होता. त्यातच रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री प्रकाश हा घरी आल्यानंतर जेवायला बसला होता. यावेळी पुन्हा एकदा देविदास यांनी त्याला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने लाकडी फळीने देविदास सूर्यवंशी यांना मारहाण केली. या मारहाणीत देविदास सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत देविदास सूर्यवंशी यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर काही वेळाने प्रकाश याला सुद्धा अंबरनाथ शहरातूनच ताब्यात घेऊन अटक केली.
अंबरनाथमध्ये बैलगाडी शर्यतीवरुन राडा, दोन गटात गोळीबार
तर कालच (13 नोव्हेंबर) अंबरनाथमध्ये बैलगाडी शर्यतीवरुन दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर गोळीबार झाल्याची घटना घडली. अंबरनाथच्या एमआयडीसी परिसरात संध्याकाळी ही घटना घडली. या घटने कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासानुसार, अंबरनाथमधील एका गावात बैलगाडी शर्यती सुरु असताना हा राडा झाला. यावेळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर गोळीबार केला, सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही.
हेही वाचा