Mumbai Crime: मुंबईतील NRI धमकी प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; जावेद चिकनाच्या नावाने खंडणीसाठी फोन
Mumbai Crime Extortion: मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील एका फरार आरोपीने मुंबईत राहणाऱ्या एका NRI ला फोन करून खंडणीची धमकी दिली.
Accused in 1993 Blast Extortion Case : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Serial Blast 1993) प्रकरणातील एका फरार आरोपीने मुंबईत राहणाऱ्या एका NRI ला फोन करून खंडणीची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी सेलनं एका 60 वर्षीय व्यावसायिकाला अटक केली आहे. या प्रकरणात जावेद चिकना (Javed Chikna) या आरोपीचा हात असल्याची माहिती आहे. जावेद चिकना हा मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असून तो फरार आहे.
मुंबईतील NRI धमकी प्रकरणाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन
मुंबई शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने अंधेरी येथील रहिवासी झाकीर सज्जाद हुसेन या NRI खंडणी आणि धमकी प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा शकीलचा हस्तक जावेद चिकना याचा या प्रकरणात हात असल्याचं समोर आलं आहे.
NRI ला फोन करून खंडणीची धमकी, एकाला अटक
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाकीर हुसेन असं अटक आरोपीचं नाव असून तो अंधेरीतील चार बंगला परिसरात राहतो. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कुवेतमधील त्याच्या व्यवसायात त्याचं नुकसान झालं आहे. या प्रकरणात त्याला तक्रारदार NRI कडून ते नुकसान भरून काढायचं आहे. कुवेतमधील एका इलेक्ट्रॉनिक शॉपिंग सेंटरमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी अंडरवर्ल्डचा अवलंब केला होता.
तक्रारदार आणि आरोपी यांची कुवेतमध्ये 2013 साली भेट झाली होती. हुसैनवर कुवेतमध्ये सीडी, तंबाखू आणि गुटखा, पान मसाला आणि बॅन औषधाच्या व्यापारात सहभागी असल्याचा आरोप आहे. हुसेनने तक्रारदाराला त्याच्या इलेक्ट्रॉनिक व्यवसायात भागीदार (Partner) बनवण्यास सांगितलं होतं पण तक्रारदाराने त्याला पार्टनर बनवण्यास नकार दिला.
2016 मध्ये हुसैन याने तक्रारदाराकडे 1.50 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास कुवेतमध्ये त्याचा व्यवसाय चालू देणार नाही, अशी धमकी दिली. तक्रारदाराला याआधी कुवेतमधील एका अनोळखी नंबरवरून दोनदा कॉल आले होते. यावेळी कॉलरने त्याला धमकी दिली आणि हुसेनसोबत सेटल होण्यास सांगितलं.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी त्याला जावेद चिकना यांचा फोन आला होता, त्याने हुसेनला पैसे देण्यास सांगितलं आणि त्याला मारण्याची धमकी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :