(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan News : आईसोबत झोपलेल्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण; अवघ्या बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
Kalyan News : एक महिला आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत फुटपाथवर झोपले असताना तिच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत अवघ्या 12 तासात या बाळाचा शोध घेतलाय.
Kalyan Crime News ठाणे : रात्रीच्या सुमारास एक भंगार गोळा करणारी महिला फुटपाथवर झोपलेली असताना तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची (Kalyan Crime) घटना घडली होती. कल्याणच्या पश्चिम परिसरात घडलेली ही घटना असून ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. या खळबळजनक घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सतर्कता दाखवत तात्काळ या बाळाचा शोध सुरू केला. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून अवघ्या 14 तासात या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या असून सहा महिन्याच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.
दिनेश सरोज आणि अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती अशी या दोघांची नावे असून यामधील दिनेश सरोज हा रिक्षाचालक आहे. तर अंकित कुमार हा टेलर असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या दोघांनी हे बाळ विकण्यासाठी चोरले होते का, की त्यांचा आणखी काही उद्देश होता, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
अवघ्या बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
मूळची नाशिक सिन्नर फाटा येथील झोपडपट्टीत राहणारी आयेशा कल्याण येथे भंगार गोळा करण्याचे काम करते. हे भंगार विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आयेशाला अरबाज हा 6 महिन्याचा मुलगा आहे. दिवसभर काम करून रस्त्याच्या कडेला आसरा शोधून ती मुलासह रात्रीचा निवारा शोधायची. नेहमीप्रमाणे ती मुलांसह कल्याण पश्चिमेकडील व्हर्णाल मेमोरियल मेथडिस्ट चर्चच्या शेजारी असलेल्या कल्याण- डोंबिवली परिवहन डेपोच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपली होती.
दरम्यान, ती गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन उल्हासनगर मधील रिक्षाचालक दिनेश सरोज (वय 35) याने आपला टेलर काम करणारा मित्र अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती यांच्या मदतीने तिच्या अरबाज शेख या सहा महिन्याच्या चिमुरड्याचे गोणीत भरून अपहरण केले. याप्रकरणी आयेशा हिने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली . ती गाढ झोपेत असल्याची संधी साधत उल्हासनगर मधील रिक्षाचालक दिनेश सरोज याने शेजारी राहणाऱ्या टेलरिंग काम करणाऱ्या अंकितकुमार राजेंद्रकुमार प्रजापती याला बरोबर घेऊन आयेशाच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुरड्याला पोत्यात भरून रिक्षातून पळवून नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
आई सोबत झोपलेल्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण
आपल्या कुशीत झोपलेला चिमुरडा अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच आयेशाने तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या बाळाला शोधण्याची विनंती केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने या परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता, दिनेशने या चिमुरड्याचे अपहरण केल्याचे समोर आले. यांनतर पोलिसांना हा रिक्षाचालक उल्हासनगर मधील असल्याचे कळताच पोलिसांनी दिनेश आणि अंकित कुमार या दोघांना अटक करत दिनेशच्या घरातून अपहृत बालकाची सुटका केली.
चिमुरड्याचे अपहरण विक्रीसाठी?
दरम्यान दिनेशला चार मुले असून धाकटा मुलगा सहा महिन्याचा आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दिनेशची पत्नी आपल्या मुलांसह पळवलेल्या मुलाला देखील दूध पाजत होती. यामुळे दिनेशने या मुलाचे अपहरण विक्रीसाठी केले, की आणखी काही उद्देश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या चिमुरड्याचे अपहरण विक्री करण्यासाठी केले होते किंवा जादूटोण्याच्या उद्देशाने केले असावे, असा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले आहे. या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या