(Source: ECI/ABP News/ABP Majha)
23 वर्षीय तरुणीने संपवले जीवन, मरीन ड्राईव्हवरुन समुद्रात घेतली उडी; व्हॉट्सअप चॅटवरुन उलगडा
मरीन ड्राईव्ह य़ेथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
मुंबई : मानसिक ताण तणाव किंवा प्रेमसंबंधातून आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही वर्षात सातत्याने घडत असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित व्यक्तीही स्वत:चं जीवन संपवत आहेत. आता, मुंबईतील (Mumbai) मरीन ड्राइव्ह (Marin drive) परिसरात एका 23 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ममता कदम असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती अंधेरी (Andheri) येथील रहिवाशी होती. दरम्यान, पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याचं समोर आली आहे.
मरीन ड्राईव्ह य़ेथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने समुद्रातून तरूणीला बाहेर काढून मुंबईतील जी.टी.रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी तपासही सुरू केला होता.
महिलेने समुद्रात उडी मारण्यापूर्वी चौपाटीवर तिची बॅग सोडली होती. त्यातील ओळख पत्रावरून महिलेचे नाव ममता प्रवीण कदम(23 वर्षे) असल्याचे पोलिसांना समजले. ममता ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत कामाला होती. सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र, ती कामावर गेलीच नाही, तिने थेट मरीन ड्राईव्ह परिसर गाठले. यावेळी, इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल समोरील चौपाटीवर ती समुद्रात उतरली होती, इथेच बुडून तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास युवतीला पाण्यातून बाहेर काढले. तरूणीचा मोबाईल पोलिसांना मोबाईल सापडला असून त्यातील व्हॉट्सअॅप चॅटींगवरून वैयक्तिक कारणास्तव तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत जाणार?; अजित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया, थेट इशारा