Video : एक लग्न असंही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न
लग्न म्हणजे दोन जीवाचं आणि दोन कुटुंबाचं मिलन असतं, त्यामुळे लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या आनंदाने सहभागी होत असतो
नंदूरबार : एकीकडे भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे, मात्र दुसरीकडे अद्यापही ग्रामीण भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दोन दिवसांपूर्वीच मुंबईत 30 हजार कोटींच्या पायाभूत सुविधांच्या बड्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. मात्र, पावसाळ्यात विविध जिल्ह्यातील रस्ते आणि सुविधांचा अभाव असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यातच, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. त्यामध्ये, नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडी मंडळी चक्क पाण्यातून मार्ग काढत लग्नसोहळ्याला (Marriage) जात असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे काही लग्नांसाठी रेड कार्पेट अंथरलं जात असताना दुसरीकडे शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारं हे चित्र आहे.
लग्न म्हणजे दोन जीवाचं आणि दोन कुटुंबाचं मिलन असतं, त्यामुळे लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या आनंदाने सहभागी होत असतो. लग्न मुलीच्यांकडे असल्यास नवरदेव वऱ्हाड घेऊन मुलीच्या गावी पोहोचतो. तर, लग्न मुलांच्याकडे असल्यास नवरीमुलीला घेऊन त्यांचं वऱ्हाड मुलांच्या लगीन घरी येत असतं. सजवलेल्या गाड्यांचा ताफा आणि नवरदेवाची खास सोय केल्याचं यावेळी पाहायला मिळतं. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडी मंडळींची मोठी गैरसोय झाल्याचं दिसून आलं. सध्या पावसाळ्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून ग्रामीण भागात पुलावरुन पाणी वाहत आहे. तर, अनेक गावांचा संपर्कही तुटत असल्याचं दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भागात रस्ते आणि अनेक सुविधांचा आजही अभाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वहेगी गावातून जाणाऱ्या बारीपाडा गावाला जाणारा मार्ग देवनदीच्या मधून जातो. या ठिकाणाहून जाणाऱ्या नदीवर पूल नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गावात असलेल्या एका लग्न कार्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीना चक्क नवरदेवाला खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागला. नवरदेवासह वऱ्हाडी आणि पै पाहुण्याची अशी झालेली आबाळ, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नवरदेव खांद्यावर आणि वऱ्हाडी पाण्यात हे चित्र व्हिडिओत कैद झालं असून आतातरी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला जाग येईल का, येथील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन मार्ग सुकर होईल का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
दरम्यान, भारत महासत्ता होण्याचं स्वप्न देशाचे पंतप्रधान आणि राजकीय नेतेमंडळी पाहतात ही अभिमानाची बाब आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात मूलभूत सुविधांसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत समस्यांची सोडवणूकही अद्याप झाली नसल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.