(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एलॉन मस्क यांच्या टेस्लाला भारतात विशेष कर सवलत? महसूल सचिव म्हणतात...
Tax Exemption To Elon Musk Tesla: एलॉन मस्क यांच्या टेस्लाला करात सूट देण्याचा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर नसल्याचं महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
Tax Exemption To Elon Musk Tesla: टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (Space X) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना भारत सरकारकडून विशेष दिलासा मिळणार नाही. टेस्लाला भारतात विशेष कर सवलत मिळणार असल्याचं बोललं जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र टेस्लाला विशेष कर सवलत मिळणार असल्याचा दावा नाकारला आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, एलॉन मस्क यांच्या टेस्लाला करात सूट देण्याचा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर विचाराधीन नाही. दरम्यान, टेस्ला भारतात दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे.
भारत सुरुवातीपासूनच ठाम
टेस्लाला भारतात कार विकायची असेल तर ती देशातच बनवावी लागेल, यावर भारत सुरुवातीपासूनच ठाम आहे. भारतीय बाजारपेठेतील मागणी तपासण्यासाठी आधी कार आयात करून त्यांची विक्री करायची असल्याचं टेस्लानं यापूर्वी सांगितलं होतं. गेल्या महिन्यात टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क म्हणाले होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार कंपनी टेस्लाला भारतात मोठी गुंतवणूक करण्यास आग्रही होते. त्यामुळे लवकरच अशी घोषणा होऊ शकते.
आयात शुल्क 100 टक्के
महसूल सचिव म्हणाले की, "टेस्लाला कोणत्याही करात सूट देण्याची बाब महसूल विभागाच्या विचाराधीन नाही." या अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनीचा भारतात प्रवेश गेल्या वर्षीच झाला असता. परंतु सरकारनं टेस्लाच्या कारसाठी आयात शुल्क कमी करण्यास नकार दिला. भारत इलेक्ट्रिक वाहनांवर जवळपास 100 टक्के आयात शुल्क आकारतो. या वर्षी मे महिन्यात कंपनीनं अधिकाऱ्यांशी नव्यानं बोलणी सुरू केली होती. कार आणि बॅटरी उत्पादनासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबतही चर्चा करण्यात आली होती.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मस्क अन् भेट
टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती. भारतात गुंतवणूक करण्याविषयी त्यांच्या चर्चा झाल्याचं समजत आहे. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया त्यावेळी मस्क यांनी दिली होती. मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही मस्क म्हणाले होते. तसेच मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचं वक्तव्य देखील मस्क यांनी यावेळी केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Elon Musk : मस्क देणार ChatGPT ला टक्कर, xAI नवीन आर्टिफिशल इंटेलिजंस कंपनी लाँच