(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ड्रीम कार घ्यायचीय पण पैसे नाहीत? चिंता सोडा 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून घरी आणा आवडती कार!
प्रत्येकाच्याच मनात एक ड्रीम कार असते. मी ती कार कधीतरी घेईल, असं स्वप्न प्रत्येकजण पाहात असतो. मात्र हे सूत्र वापरून तुम्ही तुमच्या स्वप्नातली कार खरेदी करू शकता.
मुंबई : माझ्या घरासमोर एक छानशी कार उभी असावी, असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येकाची आपली अशी एक ड्रीम कार (Car Purchasing) असते. मात्र ही कार खरेदी कशी करायची? असा प्रश्न अनेकांना पडतो. कार खरेदी करण्यासाठी पैशांची बचत कशी करावी, याची कल्पनाही अनेकांना नसते. मात्र कोणतेही कर्ज न काढता, प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करावी लागेल. अगदी 1000 रुपयांची एसआयपी करूनदेखील तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करू शकता.
1000 रुपये गुंतवून करा कार खरेदी
थोडी-थोडी सेव्हिंग करून तुम्ही कार कशी खरेदी करू शकता, हे जाणून घेऊ. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची एसआयपी करत असाल तर 20 वर्षांनंतर तुम्हाला तुमची ड्रीम कार खरेदी करता येईल. हे कसे शक्य आहे, ते उदाहरणासह समजून घेऊ. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 25 वर्षांसाठी 1000 रुपयांची एसआयपी केली तर तुम्हाला 18, 97,635 रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकतो.
किती रुपये गुंतवल्यावर किती पैसे मिळणार?
समजा तुम्ही दहा वर्षांसाठी प्रतिमहिना 9 हजार रुपये गुंतवले तर 12 टक्के व्याजाप्रमाणे एकूण 20 लाख 91 हजार रुपये मिळतील. समजा तुम्ही 9 हजार ऐवजी 7 हजार रुपयांची एसआयपी केली तर तुम्हाला 10 वर्षांत 16 लाख रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्हाला तुमच्या आवडीची कार खरेदी करता येईल. समजा तुमचे सध्याचे वय हे 20 वर्षे आहे आणि तुम्ही प्रतिमहिना 10 हजार रुपयांची एसआयपी केली तर पुढच्या पाच वर्षांत तुम्ही सहा लाख रुपयांची गुंतवणूक कराल. पाच वर्षांतून तुम्हाला 8 लाख 24 हजार रुपये मिळतील. समजा तुमचे वय 22 वर्षे असेल आणि तुम्ही प्रतिमहिना 20,000 रुपयांची एसआयपी चालू केली तर चार वर्षांत तुमची 9,60,000 रुपयांची बचत होईल. याच 9 लाख 60 हजार रुपयांचे तुम्हाला 12,36,697 रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकता.
25 वर्षे गुंतवणूक करा, कार घ्या
दुसरीकडे तुमच्याकडे अधिक पैसे नसतील तरीदेखील चिंता करण्याची गरज नाही. अगदी 500 रुपयांपासून तुम्ही एसआयपी करू शकता. तुम्ही 25 वर्षांसाठी प्रतिमहिना 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमचे 25 वर्षांत 1,50,000 रुपये जमा होतील. साधारण 12 टक्के व्याजाच्या हिशोबाने याच पैशांचे 25 वर्षांनी तुम्हाला 9,48,818 रुपये मिळतील. या पैशांतूनही तुम्ही एक कार खरेदी करू शकता.
दरम्यान, एसआयपीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवता येत असला तरी यात जोखीम असते. भांडवली बाजारातील चढऊतार यावरून तुमच्या पैशांचे मूल्य कमी-अधिक होत असते. त्यामुळे योग्य काळजी घेऊन तुम्ही पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
करोडपती व्हायचंय? मग एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर!
आयटीआर भरण्यासाठी फॉर्म 16 हवाय? चिंता सोडा 'असा' करा डाऊनलोड!