(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मॅटर्निटी पॉलिसीचं नेमकं महत्त्व काय? सोप्या पद्धतीने समजून घ्या!
आरोग्य विमा आज काळाची गरज झाला आहे. आरोग्य विम्यामध्येही मॅटर्निटी विमा यालादेखील तेवढेच महत्त्व आहे. ऐनवेळी आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून हा विमा काढणे गरजेचे आहे.
मुंबई : माणसाला कोणता आजार कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजकाल आरोग्य विम्याचे महत्त्व वाढले आहे. महिलांसाठीही अशाच प्रकाराचा मॅटर्निटी इन्शुरन्स असतो. प्रसूतीदरम्यान होणार सर्व वैद्यकीय खर्च या इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. याच कारणामुळे महिला बाळाचा विचार करत असतील किंवा लग्नाचा विचार करत असतील तर त्यांनी मॅटर्निटी इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे.
नियम काय आहे?
महिलांना प्रसूतीच्या काळात आर्थिक चणचण भासू नये म्हणून विमा कंपन्यांकडून मॅटर्निटी इन्शुरन्स दिला जातो. या इन्शुरन्स अंतर्गत महिलेचा प्रसूतीदरम्यानचा सर्व खर्च विमा कंपनी देते. अगोदर अशा प्रकारच्या इन्शुरन्सचा वेटिंग पिरियड (प्रतीक्षा कालावधी) हा दोन ते तीन वर्षांचा असायचा. आता मात्र हा कालावधी कमी करण्यात आला आहे. विमाधारक महिला गर्भवती राहिल्यास तिला कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून अनेक विमा कंपन्या हा वेटिंग पिरियड कमी करत आहेत.
अनेक कंपन्यांनी वेटिंग पिरियड बदलला
लग्न केल्यानंतर अनेक दाम्पत्य बाळाचा विचार करतात. त्यासाठी त्यांचे नियोजन चालू होते. मूल जन्माला घालणे हा दाम्पत्याच्या आयुष्यातील सर्वांत सुखत अनुभवांपैकी एक अनुभव असतो. मात्र मूल जन्माला घालायचं म्हटल्यावर पैशांचेही नियोजन करावे लागते. म्हणूनच मॅटर्निटी इन्शुरन्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. भारतात मॅटर्निटी इन्सुरन्सचा वेटिंग पिरियड हा 9 महिन्यांपासून 4 वर्षांपर्यंत आहे. समजा तुम्ही आगामी दोन ते तीन वर्षांनंतर बाळाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अशा प्रकारचा मॅटर्निटी विमा योग्य ठरू शकतो.
मॅटर्निटी इन्शुरन्सचा फायदा काय?
मॅटर्निटी इन्शुरन्सचे अनेक फायदे आहेत. लग्न न झालेली व्यक्तीदेखील अशा प्रकारचा इन्शुरन्स काढू शकते. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराचे नाव या इन्शुरन्समध्ये जोडून घेतल्यास तुम्हाला मॅटर्निटी इन्शुरन्सचा फायदा मिळतो. मॅटर्निटी इन्शुरन्समध्ये इतरही गोष्टी कव्हर होतात. उदाहरणार्थ एखाद्या महिलेला वंध्यत्व आले असेल तर त्यावरील उपचाराचा खर्च काही विमा कंपन्या उचलतात. तर काही कंपन्या इन विट्रो फर्टिलाइजेशनचाही (आईव्हीएफ) खर्च देतात. अशा स्थितीत महिलांना त्यांच्या खिशातून पैसे देण्याची गरज नसते. त्यामुळे मॅटर्निटी इन्शुरन्स महत्त्वाचा आहे.
हेही वाचा :
चार महिन्यांत भारत सरकारने खरेदी केलं तब्बल 24 टन सोनं, तिजोरीतील सोन्याचा साठा 827 टनांवर!
EPFO कडून एक नव्हे तर दिली जाते सात प्रकारची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर