एअर इंडिया आणि विस्ताराचा विलीनीकरणचा मार्ग मोकळा, सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटी गुंतवणूक करणार
Air India : एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्स एकमेकांमध्ये विलीन होतील. विस्तारा आणि एअर इंडियाचे 2024 पर्यंत विलीनीकरण अशी माहिती आहे.
Vistara will be merged with Tata Group-owned Air India : एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्स एकमेकांमध्ये विलीन होतील. विस्तारा आणि एअर इंडियाचे (Air India) 2024 पर्यंत विलीनीकरण अशी माहिती आहे. विस्तारा एअरलाइन्स मधील भागीदार असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या संचालक मंडळाने विलीनीकरणास मान्यता दिली आहे. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये करार झाला आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डाच्या या निर्णयामुळे टाटा समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण टाटाला त्यांचे चार एअरलाईन्स ब्रँड एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन करायचे आहेत.
दरम्यान या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटींची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सने यासंदर्भात एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. भविष्यात एअरलाइनच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्यासाठी निधीची गरज भासल्यास या दोन कंपन्या ते पुरवतील. टाटा सध्या विस्तारामध्ये 51 टक्के तर सिंगापूर एअरलाइन्सकडे 49 टक्के हिस्सा आहे.
दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी
या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली नवी कंपनी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असेल. विशेष म्हणजे टाटा एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण करू शकते अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. विशेष म्हणजे हे विलीनीकरण नियामक मंजुरीवरही अवलंबून आहे. वृत्तानुसार, टाटा सन्स एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया (Air India) एक्सप्रेसचे विलीनीकरण करण्याच्या योजनेवरही काम करत आहे. या विलीनीकरणाला सीसीआयची मान्यता मिळाली आहे.
या वर्षी एअर इंडियाची घरवापसी
टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून ऑक्टोबर 2021 मध्ये सरकारकडून एअर इंडिया विकत घेतली होती. 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने 12,906 कोटी रुपयांची राखीव किंमत ठेवली होती. टाटा सन्सने या वर्षी जानेवारीमध्ये औपचारिकपणे विमान कंपनीचे कामकाज हाती घेतले. या अधिग्रहणाकडे एअर इंडियाची टाटांकडे घरवापसी म्हणून पाहिले जात होते. एअर इंडियाचीही स्थापना टाटा समूहाने केली होती. हे 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स म्हणून सुरू झाले होते जे 1946 मध्ये एअर इंडियामध्ये बदलले गेले. त्यानंतर 1953 मध्ये सरकारने ते आपल्या ताब्यात घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे जेआरडी टाटा 1977 पर्यंत त्याचे अध्यक्ष होते.