चप्पल, बूट विकणाऱ्याकडे पैशांचं घबाड, प्राप्तिकर विभागाने जप्त केली तब्बल 40 कोटींची रोकड!
उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत प्राप्तिकर विभागने एकूण 40 कोटींची रोकड जप्त केली आहे.
लखनौ : सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात सध्या देशात अनेक ठिकाणी कोट्यधींची रोख रक्कम सापडलेली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील आग्रा (Uttar Pradesh Agra) या शहरात एका चपलेच्या व्यावसाय असणाऱ्या व्यक्तीकडे तब्बल 40 कोटींची रोकड सापडली आहे. प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्यानंतर ही कोट्यवधीची रक्कम संबंधित व्यक्तीकडून जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईनंतर आग्र्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा चप्पल, बुटाचा व्यवसाय आहे. प्राप्तिकर विभागाने याच व्यक्तीशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापेमारी केली. शनिवारी (18 मे) दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्राप्तिकर विभागाला एकूण 40 कोटी रुपये रोख स्वरुपात सापडले आहेत. या व्यावसायिकाकडून जप्त करण्यात आलेल्या या पैशांची मोजणी अजूनही चालूच आहे. त्यामुळे आगामी काळात जप्त करण्यात आलेली ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
सगळीकडे फक्त 500 रुपयांच्या नोटा
आयटी विभागाने केलेल्या या कारवाईत फक्त 500 रुपयांच्याच नोटा दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाला या व्यावसायिकाकडून कर चुकवला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर आयटी विभागाने या व्यापाऱ्याच्या घरावर तसेच इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या छापेमारीत आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. अजूनही आयटी विभागाचे अधिकारी जप्त केलेली रक्कम मोजत आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये जप्त केली 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातदेखील प्राप्तिकर विभागाने अशीच एक मोठी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यात 8 किलो दागिने, 14 कोटी रोख रुपयांचा समावेश होता. ही बेहिशोबी मालमत्ता मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला 72 तास लागले होते. ही कारवाई करण्यासाठी 25 वाहनांत साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी नांदेडमध्ये गेले होते. विशेष म्हणजे या कारवाईसाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी इत्यादी शहरातील प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते.
हेही वाचा :
26 गाड्यांचा ताफा, 60 अधिकारी, प्राप्तिकर विभागाची नांदेडमध्ये छापेमारी, 170 कोटींची मालमत्ता जप्त!
वयाच्या 58 वर्षांधीच अर्ली एज पेन्शन पाहिजे? जाणून घ्या ईपीएफओचा नियम काय सांगतो?
पैसे कमवण्याची संधी चुकवू नका, नव्या आठवड्यात दोन नवे आयपीओ येणार!