(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unclaimed Amount In Bank: तब्बल 35 हजार कोटींच्या रक्कमेला 'मायबाप'च नाही; सरकारने उचलले 'हे' पाऊल
Unclaimed Amount In Bank: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली जवळपास 35 हजार कोटींची बेवारस रक्कम आरबीआयला दिली आहे.
Unclaimed Amount In Bank: बँक खात्यात अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतात. काही वेळा विविध कारणांनी एकापेक्षा अधिक बँक खाते सुरू केले जातात. मात्र, कालांतराने या बँक खात्याकडे खातेदाराचे दुर्लक्ष होते. त्याशिवाय अशीदेखील काही बँक खाती आहेत, त्या खात्यांवर कोणत्याही वारसांची नोंद नसते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अशाच बेवारस खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. जवळपास 35 हजार कोटींची रक्कम आरबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागील आठवड्यात संसदेला ही माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला 35 हजार 12 कोटींची रक्कम सुपूर्द केली. या रक्कमेला कोणताही वारस नव्हता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लिखित उत्तरात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वाधिक बेवारस संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेतील आहे. एसबीआयमध्ये 8086 कोटी रुपयांची संपत्ती बेवारसपणे होती. तर, पंजाब नॅशनल बँकेत 5340 कोटी रुपये, कॅनरा बँकेजवळ 4558 कोटी रुपये जमा बेवारस, कोणताही दावा (Unclaimed Amount) नसणारी होती.
Unclaimed Amount म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बचत अथवा चालू खात्यातील रक्कमेवर जर 10 वर्षापर्यंत कोणीही दावा केला नसेल तर ती रक्कम Unclaimed Amount म्हणून गणली जाते. या पैशांना RBI ने स्थापन केलेल्या डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंड' मध्ये ( Depositor Education and Awareness Fund - DEAF) हस्तांतरीत केले जातात.
बँक खाते ठेवा अपडेट
जर तुम्हीदेखील बँक खात्यात पैसे जमा करत असाल तर खात्यात व्यवहार सुरू ठेवले पाहिजे. जर, तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी या खात्यात व्यवहार करत नसाल तर हे खाते निष्क्रिय केले जाते. या निष्क्रिय खात्यातील रक्कम Unclaimed Amount म्हणून गणली जाते.
प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, मागील आर्थिक वर्षात 16.61 लाख कोटी जमा
2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ही अधिक कर संकलन करण्यात आले. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्ष 2021-22 मध्ये 14.12 लाख कोटी रुपये इतके झाले होते. 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17.63 टक्के अधिक झाले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
प्रत्यक्ष कर संकलनाबाबत अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये तात्पुरत्या आकडेवारीनुसार, प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतके झाले. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 16.97 टक्क्यांनी अधिक म्हणजेच 2.41 लाख कोटी रुपये जास्त आहे. अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 14.20 लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार हे उद्दिष्ट 16.50 लाख कोटी रुपये करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे बजेट अंदाजापेक्षा 16.97 टक्के अधिक आणि सुधारित अंदाजापेक्षा 0.69 टक्के अधिक आहेत.