Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा
टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळं दर वाढत आहेत.
Tomato Prices: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Farmers) सध्या चांगला फायदा होताना दिसत आहे. कारण, टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे किरकोळ किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या प्रतिकिलोसाठी टोमॅटोसाठी 80 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढत्या दरामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा
सध्या टोमॅटोच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. बटाटे आणि कांद्यानंतर आता टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या किरकोळ किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढल्या आहेत. सध्या 80 रुपये प्रति किलोपर्यंत टोमॅटोचा दर पोहोचला आहे. पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार टोमॅटोचा दर किती?
सरकारी आकडेवारीनुसार टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 3 जुलै रोजी टोमॅटोच्या दैनंदिन सरासरी किरकोळ किमती 55 रुपये प्रति किलो होत्या. ज्या एका महिन्यापूर्वी 35 रुपये प्रति किलो होत्या.
का होतेय टोमॅटोच्या दरात वाढ?
टोमॅटोच्या भावात अचानक वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाला जबाबदार धरले जात आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक राज्यातील टोमॅटोचो पुरवठा विस्कळीत झाला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. खराब रस्त्यांच्या जाळ्यामुळं, हिमाचल प्रदेशातून अनेक किरकोळ बाजारपेठांमध्ये टोमॅटोचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे.
अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचेही नुकसान
हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशात 7 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ राज्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचा थेट परिणाम रस्त्यांच्या जाळ्यावर आणि वाहतुकीवर होऊ शकतो. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचेही नुकसान होऊ शकते. म्हणजेच येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात टोमॅटोचे भाव वाढतात. गतवर्षी परिस्थिती अधिकच बिकट होऊन टोमॅटोचा भाव 350 रुपये किलोवर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या मदतीने अनेक शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली.
महत्वाच्या बातम्या: