Tata Group : टाटा समूहातील 'या' कंपनीमध्ये होणार नोकर कपात; 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड
Tata Group : टाटा समूहातील टाटा स्टीलमधून 800 कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.
मुंबई : टाटा समूहातील (Tata Group) कंपनीमध्ये नोकर कपात करण्यात येणार आहे. टाटा स्टील (Tata Steel) या कंपनीमध्ये ही नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यात घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथील प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत.
'रॉयटर्स' दिलेल्या वृत्तानुसार, टाटा स्टीलच्या डच युनिटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने बाजारात आपली स्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु हे सर्व असूनही, आणखी काही करणे आवश्यक आहे. कंपनीने सांगितले की, स्वत: ला पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ कंपनीत रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली असून येत्या काही दिवसांत आणखी गुंतवणूक केली जाणार आहे.
टाटा स्टीलच्या डच युनिटच्या पुनर्रचनेचा परिणाम व्यवस्थापक स्तरावर आणि इतर कर्मचाऱ्यांवर होईल. डच स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन पद्धतींकडे वाटचाल करत असल्याने बाजारपेठेतील आपले स्पर्धात्मक आव्हान राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
टाटा समूहाचा हा स्टील कारखाना नेदरलँड्सच्या एकूण कार्बन उत्सर्जनासाठी सुमारे 7 टक्के जबाबदार आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात मोठे प्रदूषण करणारे युनिट आहे. टाटा स्टील नेदरलँड सरकारसोबत पोलाद बनवण्याच्या पर्यावरणपूरक पद्धतींकडे वळण्यासाठी काम करत आहे. परंतु टाटा स्टीलला आवश्यक असलेल्या समर्थनाबाबत अद्याप कोणताही करार होऊ शकत नाही.
नवीन योजनेअंतर्गत, टाटा स्टीलने म्हटले की, 2030 पर्यंत कंपनी कोळसा आणि लोह धातूवर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या ओव्हनसह घेईल.
आजच्या व्यवहारात टाटा स्टीलचा समभाग 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी बाजार बंद राहणार आहे, त्यामुळे या बातमीवर शेअरमध्ये काय प्रतिक्रिया उमटतील हे बुधवारीच पाहायला मिळेल.